भारताच्या लढाऊ विमानांचा गंगा एक्सप्रेस वे वर सराव (फोटो- istockphoto)
उत्तर प्रदेश: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना ‘आक्रमण’ युद्धाभ्यास करत आहेत. भारत पाकिस्तान सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या गेल्या आहेत. सीमेवर तैनाती वाढवली जात आहे.आज भारतीय वायुसेनेने थेट गंगा एक्सप्रेस वे वर लढाऊ विमानांचे लॅंडींग केले आहे.
इंडियन एअर फोर्सने उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेस वे वर फ्लाईपास्ट केले. शाहजहापुरच्या साडे तीन किमीच्या मार्गावर लढाऊन विमानांनी टेक ऑफ आणि लॅंडींगचा सराव केला आहे. भारतीय वायुसेनेचे राफेल, मिराज आणि जग्वार या लढाऊ विमानांनी अवकाशात सराव केला. हा सराव पाहून अनेकांना युद्ध सुरू झाले की काय असे वाटत होते.
गंगा एक्सप्रेस वे च्या हवाई पट्टीवर राफेल, मिराज आणि जग्वार या लढाऊ विमानांसह ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने देखील लॅंडींग आणि टेक ऑफचा सराव केला. युद्धाच्या वेळेस इमर्जन्सी असल्यास मदत व्हावी म्हणून या एक्सप्रेस वे च्या हवाई पट्टीवर हा सराव करण्यात आला. उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेस वे हा देशातील असा पहिला हायवे आहे की, ज्यावर लढाऊ विमानांना टेक ऑफ आणि लॅंडींग करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
पहलगाम हल्ल्यामागे ISI चा हात, NIA च्या रिपोर्टमध्ये काय?
पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए राष्ट्रीय तपास संस्था करत आहे. सुरुवातीच्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. पहालगाम हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, आयएसआयचा आणि पाकिस्तानी सैन्याचा हात असल्याचे समोर आले आहे. एनआयएने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
तिथे घटनास्थळी केलेल्या चौकशीत दहशतवादी बैसरन खोऱ्यात नव्हे तर अन्य ठिकाणी रक्तपात करू इच्छित होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी आपले टार्गेट बदलले आणि बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला. हल्ला करण्याच्या 2 दिवस आधीपासूनच दहशतवादी बैसरन खोऱ्यात उपस्थित होते. पहालगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. तिथून ते आपल्या हँडलर्सच्या संपर्कात होते. या दहशतवाद्यांना पाकिस्तानमधूनच निर्देश मिळत होते. पाकिस्तानमधूनच यांना या कृत्यासाठी पैसे पुरवण्यात आल्याचे समोर आले आहे.
भारताच्या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट?
भारत पाकिस्तानवर हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी सैन्याचा दबदबा सरकारवर वाढल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या भीतीने पाकिस्तानमधील सर्व मोठे निर्णय सेनाच घेत असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानी सेना आणि सरकारमध्ये तणाव असल्याचे सांगितले जात आहे. आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांना पंतप्रधान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.