जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! फक्त 20 रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळेल

काही स्थानकांवर उन्हाळ्यात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने IRCTC च्या सहकार्याने प्रवाश्यांना "बजेट-फ्रेंडली" जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याअंतर्गत सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त 20 रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळू शकते. उपलब्ध असेल.

    सध्या उन्हाळ्याच्या सुट्यांचा सिझन सुरू झाला आहे तसेच लग्नसराईचे दिवस असल्यामुळे लोकं मोठ्या प्रमाणावर प्रवास करताना दिसतात. अशावेळी रेल्वेगाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. आरक्षित डब्यांमधील प्रवाशांना सहज जेवण उपलब्ध होतं. मात्र, सामान्य डब्यातील प्रवाशांना स्टेशन आल्यावर जे पदार्थ मिळेल ते खावे लागतात. मात्र, मोठमोठ्या स्थानकांवरही थांब्यादरम्यान गर्दीमुळे प्रवाशांना फलाटावर उतरता येत नसल्याने त्यांना खाद्यपदार्थ मिळण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांच्या या अडचणी लक्षात घेता रेल्वेने एक नवीन उपक्रम सुरू केला असून, त्याअंतर्गत रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त दरात जेवण (MEALS FOR GENERAL COACHE PASSENGERS) उपलब्ध करून देण्यात येत आहे.

    फक्त 20 रुपयांमध्ये मिळेल पोटभर जेवण

    रेल्वे प्रवाशांना उन्हाळ्यात परवडणाऱ्या दरात जेवण देण्यात येत आहे. या जेवणाला ‘इकॉनॉमी मील’ असे नाव देण्यात आले आहे. त्याची किंमत ₹ 20 आणि ₹ 50 ठेवण्यात आली आहे. हे जेवण प्लॅटफॉर्मवरील सामान्य वर्गाच्या डब्यांच्या जवळ असलेल्या काउंटरवर उपलब्ध करून दिले जात आहे जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय या सुविधेचा सहज लाभ घेता येईल.

    ‘या’ स्थानकावर आहे सुविधा

    मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणाऱ्या 15 प्रमुख रेल्वे स्थानकांवर बजेट-फ्रेंडली जेवण दिले जाईल. सध्या ही सुविधा महाराष्ट्रातील इगतपुरी, कर्जत, मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्डुवाडी स्थानकावर उपलब्ध आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की “इकॉनॉमी माइल” फक्त 20 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यात सात पुर्या आणि आलू भजी असतील, तर ५० रुपयांमध्ये भाताच्या डिशेससह “स्नॅक मील” सुद्धा खरेदी करता येईल.