फोटो सौजन्य - Social Media
Diesel SUV : भारतातील कार बाजारात हॅचबॅक आणि सेडान खरेदीदारांनी डिझेल वाहनांकडे पाठ फिरवली असली, तरी SUV, ऑफ-रोडिंग आणि लाँग ड्राइव्ह आवडणाऱ्या ग्राहकांमध्ये डिझेल इंजिनची मागणी अजूनही टिकून आहे. दमदार टॉर्क, चांगले मायलेज आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरत असल्याने गेल्या तीन वर्षांत डिझेल प्रवासी वाहनांचा बाजारातील हिस्सा सुमारे १८ टक्क्यांवर कायम राहिला आहे. विशेष म्हणजे २०१२-१३ मध्ये हा हिस्सा तब्बल ४७ टक्के होता. मात्र त्यानंतर कडक उत्सर्जन नियम, पेट्रोल-CNG आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे शहरांमधील छोट्या कारमधून डिझेल जवळपास गायब झाले.
आता BS7 उत्सर्जन नियमांच्या पार्श्वभूमीवर डिझेल वाहनांचे भवितव्य पुन्हा चर्चेत आले आहे. नवीन नियमांमुळे डिझेल वाहनांच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने SUV सेगमेंटमधील डिझेलचे वर्चस्व टिकणार का, याबाबत उद्योग क्षेत्रात चर्चा रंगली आहे. तज्ज्ञांच्या मते, डिझेल आता सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा मोठ्या SUV आणि लक्झरी वाहन खरेदीदारांपुरते मर्यादित होत चालले आहे. कारण या ग्राहकांसाठी पॉवर, ड्रायव्हिंग अनुभव आणि लांब रेंज अधिक महत्त्वाची ठरते.
Mahindra & Mahindra या कंपनीला डिझेल SUV बाजाराचा मोठा फायदा झाला आहे. कंपनीच्या Mahindra Scorpio, Mahindra Thar आणि Mahindra Bolero या मॉडेल्सना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. मात्र कंपनी आता केवळ डिझेलवर अवलंबून न राहता इलेक्ट्रिक आणि इतर पॉवरट्रेन तंत्रज्ञानावरही भर देत आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार विविध पर्याय उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर असल्याचे महिंद्राच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लक्झरी कार बाजारातही डिझेल वाहनांची मागणी कायम असल्याचे दिसून येत आहे. Mercedes-Benz India चे MD आणि CEO संतोष अय्यर यांच्या मते, गेल्या तिमाहीत कंपनीच्या ५० टक्क्यांहून अधिक विक्री डिझेल मॉडेल्सची झाली. ग्राहक अजूनही मालकी खर्च, मायलेज आणि प्रवासाची क्षमता लक्षात घेऊन डिझेलला पसंती देत आहेत. त्याचवेळी कंपनी हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या पर्यायांनाही प्राधान्य देत आहे.
दरम्यान, BS7 नियमांमुळे डिझेल वाहनांच्या किंमतीत ३० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेषतः १० ते २० लाख रुपयांच्या SUV खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे आगामी काळात डिझेल ग्राहक CNG, हायब्रिड किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळतात का, याकडे संपूर्ण वाहन उद्योगाचे लक्ष लागले आहे.






