इम्फाळ : मणिपूरमध्ये अद्यापही पूर्णपणे शांतता प्रस्थापित झालेली नाही. रविवारी मध्यरात्री मणिपूरच्या मोरेहमध्ये सुरक्षा दल आणि बंडखोरांमध्ये गोळीबाराची घटना घडली. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टेकडीवर आश्रय घेतलेल्या बंडखोरांच्या एका गटाने राज्याच्या पोलिस दलांना लक्ष्य करत हल्ला केला. ज्यास पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. ही घटना म्यानमार सीमेजवळील मोरेह शहरात घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पोलिसांचे पथक या भागातून गस्तीसाठी जात होते.
1 जानेवारीला मणिपूरमध्येही हिंसाचार उसळला होता. यानंतर थौबल आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला होता. थौबल जिल्ह्यातील लिलोंग भागात अज्ञात सशस्त्र हल्लेखोर आणि स्थानिक लोकांमध्ये चकमक झाली. लिलाँगमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. सशस्त्र हल्लेखोरांनी नागरिकांवर गोळीबार केला ज्यात किमान तीन जण गंभीर जखमी झाले.
संवेदनशील माहिती प्रकाशित; पत्रकारास जामीन
मणिपूरमध्ये संवेदनशील माहिती प्रकाशित केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाची जामिनावर सुटका करण्यात आली. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. धनबीर मैबाम यांनी एका वृत्तात संवेदनशील माहिती प्रकाशित केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर गोपनीयता कायद्यांतील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.