Photo Credit- Social media
जम्मू-कश्मीर: संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या भावाने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सोपोर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. बारामुल्लाच्या डेलिना भागातील रहिवासी असलेल्या एजाज गुरुने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर काश्मीर जिल्ह्यातील सोपोरमधून उमेदवारी दाखल केली आहे.
उमेदवारी दाखल केल्यानंतर एजाज गुरू म्हणाला की, सर्व काश्मिरी लोकांप्रमाणे त्यांनाही 35 वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. 58 वर्षीय एजाज गुरू पशुसंवर्धन विभागात काम करतो. 2014 मध्ये त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडून व्हीआरएस घेतले होते. सध्या तो कंत्राटदार म्हणून काम करत आहे.
हेही वाचा: अजित पवारांनी पहिला डाव टाकला; विधानसभेसाठी 20ते 25 उमेदवारांची नावे निश्चित
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र राणा यांनीही गुरुवारी नगरोटा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. जम्मू जिल्ह्यातील नगरोटा येथून ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे जम्मू-काश्मीर निवडणूक प्रभारी राम माधव यांच्या उपस्थितीत राणा यांनी मतदारसंघातील प्रचारादरम्यान शक्तीप्रदर्शन करत रोड शो केला.
मी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. लोक मला पूर्ण पाठिंबा देत आहेत. आम्ही सरकार स्थापन करू. तर अनुराग ठाकूर म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये भाजप बहुमताने सरकार स्थापन करेल. भाजप आपल्या राजवटीत जम्मू-काश्मीरच्या विकासाचा प्रवास सुरूच ठेवणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 1 ऑक्टोबरला सोपोरमध्ये मतदान होणार आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! आगामी विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत निवडणुका होणार असून, 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण 114 जागा आहेत, परंतु राज्यातील विधानसभेच्या जागांचे परिसीमन झाल्यानंतर केवळ 90 जागांवरच निवडणुका होणार आहेत. उर्वरित २४ जागा पीओके म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतात.