झारखंडमध्ये गुटखा, पान मसाल्यावर बंदी (फोटो- सोशल मिडिया/istockphoto)
रांची: महाराष्ट्र आणि हरयाणा सरकार नंतर आता झारखंड सरकारने देखील राज्यामध्ये गुटखा,पान, मसाल्यावर बंदी घातली आहे. झारखंड सरकारने गुटखा,पान, मसाल्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सरकारने या गोष्टींची साठवणूक आणि सेवन यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तरूण आणि तरूणींना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवणे आणि राज्यातील आरोग्य सुधारणांना प्रोत्साहन देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. झारखंडचे आरोग्यमंत्री डॅा. ईरफान अंसारी यांनी याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे ‘निरोगी झारखंड’हे ध्येय साध्य करण्यासाठी पहा निर्णय एक महत्वाची भूमिका बजावेल असे, आरोग्यमंत्री डॅा. ईरफान अंसारी यांनी सांगितले.
झारखंडचे आरोग्यमंत्री डॅा. ईरफान अंसारी म्हणाले,”गुटखा, पान मसाला कर्करोगासारखे आजार मोठ्या प्रमाणात अत्यंत वेगाने पसरत आहे. ज्यामुळे आपली युवा पिढी उध्वस्त होत आहे. एक डॅाक्टक असल्याने गुटखा, पानाच्या सेवनामुळे काय परीणाम होतात हे मला माहिती आहे. त्यामुळे हे सहन करता येणार नाही. आता जनतेने मला आरोग्यमंत्री केले आहे.त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे.”
जर कोणीही व्यक्ती गुटखा, पान मसाला खाताना दिसून आले किंवा याची साठवणूक करताना आढळून आल्यास त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासन आणि आरोग्य विभागाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. यासोबतच गुटखा माफिया आणि व्यापार्य़ांवर देखील सरकार लक्ष ठेवणार आहे. गुटखा,पान मसाला यावर बंदी घालण्याचे कारण म्हणजे, राज्यातील नागरीकांचे आवाहन, विशेषतः माता-बहिणींनी केलेली मागणी होय, असे झारखंडचे आरोग्यमंत्री डॅा. ईरफान अंसारी यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला हा निर्णय स्वीकारण्याचे आणि झारखंड गुटखामुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तंबाखू अनेक रोगांसाठी कारणीभूत
तंबाखू उत्पादनाचे कोणतेही फायदे नाहीत परंतु मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तंबाखूमुळे फुफ्फुसाचा आणि तोंडाचा ९० टक्के कर्करोग होतो. तंबाखूशी संबंधित आजारांची यादी खूप मोठी असून हृदयविकार, ब्राँकायटिस, दमा, नपुंसकत्व, जन्मदोष यांचा समावेश आहे. तंबाखूच्या धुरात ७०० पेक्षा जास्त हानिकारक रसायने आणि निकोटीन, टार आणि इतर किरणोत्सर्गी घटकांसह ६९ कार्सिनोजेन्स असतात. सिगारेटच्या धुरात अमोनिया, आर्सेनिक, कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोजन सायनाइड, डीडीटी, फॉर्मल्डिहाइड इत्यादी घटकांमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात, असेही याचिकेत म्हटले आहे. तसेच भारतातील तंबाखू नियंत्रण, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यूएसए आणि डब्ल्यूएचओ यांच्या संयुक्त अहवालानुसार तंबाखूचा वापर जगातील सार्वजनिक आरोग्यासाठी एक गंभीर आव्हान असल्याचे याचिकेत म्हटले आहे.