आनंदवार्ता! ‘या’ तारखेपासून केदारनाथ धामचे दरवाजे खुले; रिल्स बनवण्याबाबत आणि दर्शनाचे नियम घ्या जाणून

देशभरातील शिवभक्तांची आनंदवार्ता समोर आली आहे. सर्व भाविक केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.

  देशभरातील शिवभक्तांची आनंदवार्ता समोर आली आहे. सर्व भाविक केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. थंडीच्या महिन्यामध्ये बर्फाच्या चादरीखाली झाकले गेलेले मंदिर आता लवकरच दर्शनासाठी खुले होणार आहे. शिवभक्तांमध्ये उत्साह असला तरी रिल्सस्टारसाठी मात्र केदारनाथ धामचे नियम कडक असणार आहेत.

  केदारनाथ मंदिराचे दरवाजे खुले करण्याची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. मंदिराला फुलांची आरास आणि सुशोभन करण्यात आले आहे. सोमवारी ओंकारेश्वर मंदिरात केदारपुरीचे रक्षक बाबा भैरवनाथ यांच्या पूजेने केदारनाथचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. बाबा केदार यांची पंचमुखी चाल-विग्रह उत्सव डोली सोमवारी विशेष पूजन करून नीजधामकडे प्रस्थान केले आहे. यासाठी ओंकारेश्वर मंदिराला आठ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. आता 9 मे रोजी ही डोली केदारनाथ धाममध्ये दाखल होईल. त्यानंतर विधीपूजेनंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार आहे. बाबा केदारनाथ धामचे दरवाजे 10 मे रोजी सकाळी 7 वाजेपाासून उघडण्यात येतील. या अलौकिक सोहळा पाहण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून देकील भाविक येत असतात. यापुढे केदारनाथ धाम समितीकडून काही नियम घालण्यात आले आहे.

  ‘या’ तारखेपर्यंत मंदिर राहणार खुलं

  चार धाम मधील एक असलेले केदारनाथ हे शिवभक्तांसाठी पृथ्वीवरील स्वर्ग आहे. भाविक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात. येत्या 10 मे रोजी पहाटे पासूनच केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे खुलण्याची प्रक्रिया सुरु होईल. 6.20 मिनिटांनी मंत्रोच्चाराला सुरुवात केली जाईल.  त्यानंतर केदारनाथ धाम भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं जाईल. 10 मे 2024 पासून 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत केदारनाथ मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. चार धाम यात्रेतील मंदिरं खुली झाल्यानंतर त्या दिवशी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार असल्याची माहिती पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.

  केदारनाथ धाम येथील नियम व अटी

  • मंदिर समितीकडून भाविकांसाठी कडक ड्रेसकोड लागू नाही. मात्र, मर्यादित कपडे घालण्याचं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलं आहे.
  • केदारनाथ धाम मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यावर निर्बंध आहेत.
  • मंदिर परिसरात फोटो काढण्यास, रिल्स बनवण्यास किंवा कोणताही व्हिडीओ शूट करण्यास मनाई आहे. गेल्या वर्षी काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.