श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन
शेख यांना सतत धाप लागण्याची समस्या जाणवत होती. ही स्थिती हळूहळू इतकी बिकट होत गेली की, अगदी कमीत-कमी हालचालही त्यांच्यासाठी कठीण होऊन बसली. त्यांचा वैद्यकीय पूर्वेतिहास तपासता वयाच्या १२व्या वर्षी त्यांना जोरात मार लागल्याने दुखापत झाल्याचे दिसून आले व त्यांच्या या स्थितीसाठी तो आघात हे एक कारण असू शकते, असे गृहित धरण्यात आले. क्लिनिकल मूल्यमापनानंतर प्रगत इमेजिंगच्या मदतीने तपासणी केली गेली तेव्हा रुग्णाचे यकृत, उदर, लहान आतडे (डुओडेनम) व मोठे आतडे (कोलन) यांचे मोठ्या प्रमाणात बहि:सरण (हर्निएशन) होऊन हे अवयव छातीच्या उजव्या भागात सरकल्याचे निश्चित झाले. यामुळे छातीच्या पोकळीतील अवयव एका बाजूला सरकले होते (मिडियास्टिनल शिफ्ट) तसेच उजवे फुफ्फुसही मोठ्या प्रमाणात दाबले गेले होते. रुग्णाच्या रोगकारक स्थितीत पोहोचलेल्या लठ्ठपणामुळे या केसची गुंतागुंत अधिकच वाढली होती.
Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
प्रौढांमध्ये इतक्या मोठ्या स्वरूपातील डायफ्रामॅटिक हर्निया अत्यंत दुर्मिळ असून यात शस्त्रक्रियेशी संबंधित अत्यंत उच्च श्रेणीतील जोखीम संभवते. उदाहरणार्थ, या केसमध्ये श्वासपटलाचा फाटलेला भाग (डायफ्रामॅटिक डिफेक्ट) त्याच्या सर्वात विस्तृत बाजूपाशी सुमारे २० सेंमी आकाराचा होता. यामुळे संपूर्ण यकृतच छातीच्या (थोरॅसिक) पोकळीमध्ये सरकले होते, ज्यामुळे श्वासोच्छवासाच्या क्रियेमध्ये तीव्र स्वरूपाचा अडथळा येत होता. जगभरात अशाप्रकारची अगदी मोजकीच, नेमकेपणाने सांगायचे तर १७३ प्रकरणे आजवर नोंदवली गेली आहे. भारतामध्ये प्रौढ व्यक्तीमधील अशाप्रकारच्या प्रचंड आकाराच्या व विशाल स्वरूपाच्या, २० सेंमी आकाराचा दोष असलेल्या डायफ्रामॅटिक हर्नियावरील शस्त्रक्रियेचे हे पहिलेच प्रकरण आहे.
या केसमध्ये अवयवांचे ज्या प्रमाणात विस्थापन तसेच ही स्थिती जितक्या प्रदीर्घ काळासाठी तशीच राहिली होती ते पाहता ही समस्या सोडविण्यासाठी काटेकोर नियोजनाची व विविध स्पेशलिटीच्या दरम्यान निकट समन्वयाची गरज होती. डॉ. विमेश राजपूत, कन्सल्टन्ट थोरॅसिक सर्जरी व डॉ. निलेश डॉक्टर, संचालक (प्रशासन) सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी यांच्या नेतृत्वाखालील मल्टिडिसिप्लिनरी टीमने शस्त्रक्रिया हाती घेतली. डॉ. मोहीत, कन्सल्टन्ट अॅनेस्थेशिओलॉजी यांनी अॅनेस्थेशियाची बाजू सांभाळली, अतिदक्षता देखभालीचे नेतृत्व डॉ. श्रृती टंडन, अतिरिक्त संचालक, क्रिटिकल केअर यांनी केले तर डॉ. उशा कासारे, कन्सल्टन्ट फिजिओथेरपी यांनी फिजिओथेरपीची मदत पुरवली.
ही प्रक्रिया जवळ-जवळ १० तास चालली. पहिल्यांदा ती लॅप्रोस्कोपिक पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र यकृत, श्वासपटल (डायफ्राम) आणि फुफ्फुस हे एकमेकांना घट्ट चिकटून असल्याने खुल्या शस्त्रक्रियेचा मार्ग निवडावा लागला. पोटाच्या मार्गाने आत शिरत सर्जिकल टीमने बहि:सरीत अवयवांना काळजीपूर्वक हलवले व त्यांना उदराच्या पोकळीमध्ये पुन्हा स्थापित केले. श्वासपटलाशी संबंधित (डायफ्रॅग्मॅटिक) डिफेक्ट छातीच्या पोकळीवाटे (थोरॅक्स) दुरुस्त करण्यासाठी उघडा ठेवण्यात आला, त्याचवेळी पोटाचे स्नायू घट्ट बंद करणे जाणीवपूर्वक टाळण्यात आले, जेणेकरून उदराच्या अंतर्भागातील दाब नियंत्रणात रहावा आणि अॅबडॉमिनल कम्पार्टमेंट सिंड्रोमचा (उदरातील दाब अचानक वाढणे) धोका कमी व्हावा.
यानंतर व्हिडिओ असिस्टेड थोरॅस्कोपिक शस्त्रक्रियेचा वापर करून थोरॅसिक अर्थात छातीच्या पोकळीशी संबंधित टप्पा पार पाडण्यात आला. यात डायफ्रामॅटिक हर्निया दोन पदरी जाळी बसवून दुरुस्त करण्यात आला व अशाप्रकारे शरीराच्या या अंतर्भागाची रचना स्थिर राहील याची काळजी घेतली गेली.
या केसविषयी बोलताना जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कन्सल्टन्ट, थोरॅसिक सर्जरी डॉ. विमेश राजपूत या केसविषयी बोलताना म्हणाले, “एक थोरॅसिक सर्जन म्हणून, एकमेकांना घट्ट चिकटलेले अवयव काळजीपूर्वक दूर करणे आणि श्वासपटलाला पडलेले मोठे छिद्र दुरुस्त करणे यावर मी माझे लक्ष केंद्रित केले होते. हे अवयव इतक्या प्रदीर्घ काळासाठी आपल्या जागेवरून सरकलेले होते की, त्यांना सामान्य स्थितीत आणण्यासाठी अत्यंत नेमकेपणाने आणि धीराने काम करणे गरजेचे होते. व्हिडिओ-असिस्टेड थोरास्कोपिक तंत्रांचा वापर करून आम्ही दोन पदरी जाळी बसवून त्या भागाची रचना स्थिर राहील, याची काळजी घेतली. ही प्रचंड कष्टसाध्य प्रक्रिया होती, मात्र शस्त्रक्रियेच्या प्रत्येक तासागणिक रुग्णाची श्वसनक्षमता पूर्ववत होताना पाहून या सर्व कष्ट फळाला आले.”
या केसविषयी आपले विचार मांडताना जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी प्रशासन विभागाचे संचालक डॉ. निलेश डॉक्टर म्हणाले, “छातीत सरकलेले यकृत, पोट आणि आतडे पुन्हा मूळ जागी आणणे हे तांत्रिकदृष्ट्या कठीण काम होते. २० सेंमीचा ‘डायफ्रामॅटिक’ दोष मोठा असल्याने त्याचे नियोजन काटेकोरपणे करावे लागले. पोटातील दाब वाढून धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी पोटाचे स्नायू पूर्णपणे बंद करण्याऐवजी ‘मेश’चा (जाळीचा) वापर केला. अवयवरचना पुन्हा पूर्ववत करून रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणेचा पाया रचणे हा त्यांच्यासाठी समाधानकारक अनुभव होता..”
Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
शस्त्रक्रियेनंतरची स्थिती नाजूक असल्याने रुग्णाला ९ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, त्यानंतर श्वसन सुलभ करण्यासाठी ‘ट्रॅकिओस्टोमी’ करण्यात आली. रिकव्हरी दरम्यान उद्भवलेल्या न्यूमोथोरॅक्स आणि श्वसनसंस्थेच्या समस्यांवर प्रगत अँटिबायोटिक्सद्वारे उपचार करण्यात आले. टप्प्याटप्प्याने केलेले श्वसन पुनर्वसन आणि योग्य पोषण आहारामुळे रुग्णाची प्रकृती स्थिर होऊन सुधारण्यास मोलाची मदत झाली.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सीईओ जितेंद्र हरयान म्हणाले, “ही केस हॉस्पिटलची दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करण्याची मल्टिडिसिप्लिनरी (बहुविद्याशाखीय) ताकद दर्शवते. अशा यशासाठी केवळ शस्त्रक्रिया कौशल्यच नव्हे, तर अचूक नियोजन, टीममधील समन्वय आणि अतिदक्षता विभागाची (ICU) सातत्यपूर्ण देखरेख अत्यंत आवश्यक असते. डॉ. विमेश राजपूत, डॉ. निलेश डॉक्टर आणि संपूर्ण टीमने दाखवलेले असाधारण कौशल्य आणि समर्पणामुळेच रुग्णाची यशस्वी रिकव्हरी शक्य झाली.”
शस्त्रक्रियेची जटिलता आणि त्यानंतरचा कठीण काळ असूनही, रुग्णाच्या प्रकृतीत उल्लेखनीय सुधारणा झाली. अवघ्या तीन आठवड्यांत त्यांनी स्वतःहून अन्न घेण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या हालचाली पूर्ववत झाल्या. हॉस्पिटलमधील २२ दिवसांच्या उपचारानंतर, डिस्चार्जच्या वेळी त्या बाह्य ऑक्सिजनविना २० ते ३० मिनिटे ट्रेडमिलवर सहज चालण्याइतपत सुदृढ झाल्या होत्या.
आपल्या या अनुभवाची आठवण सांगताना शेख सांगतात, “एकेकाळी साधा श्वास घेणेही कठीण झाले होते आणि त्याच भीतीपोटी मी शस्त्रक्रियेला सामोरी गेले. वेंटिलेटर आणि जंतूसंसर्गाचा तो काळ अत्यंत भीतीदायक होता. मात्र, जसलोक हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या उत्तम देखभालीमुळे मी या संकटातून सुखरूप बाहेर पडले. ज्या स्थितीत श्वास घेणे अशक्य वाटत होते, तिथे आज ट्रेडमिलवर चालणे हे माझ्यासाठी मोठे यश आहे.”






