जिल्हा परिषद मुख्यालयात आयोजित समन्वय सभेमध्ये सीईओ मिन्नु बोलत होत्या. सभेत त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या. जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात झालेल्या समन्वय सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांच्यासह ‘एमआरइझीएस’, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, महिला व बालविकास विभाग, पाणीपुरवठा विभागप्रमुखांसह, गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सीईओ यांनी वेळेबाबत आणि स्वच्छतेवर अधिक भर देत, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेचे बंधन पाळण्याचे आवाहन केले. आपल्या कार्यालयात, परिसरात कायमस्वरूपी स्वच्छता ठेवावी. तुम्ही कार्यालयात असताना सर्वांना भेटून त्यांच्या समस्या सोडवणे आवश्यक आहे. फिल्डवर असाल तर तसे नोंदवहीत नोंद करून ठेवा. गंगापूर, वैजापूर पंचायत समिती तसेच शिक्षण विभागात स्वच्छता व नीटनेटकेपणा दिसला नाही त्यामुळे, फायली अब क ड वर्गीकरण तसेच कालवा झालेल्या फायलींचा निपटारा, पंचनामा करून त्याचे निर्लेखन करण्याबाबत त्यांनी सूचित केले.
झेडपी, पंचायत समितीत येणारा सामान्य माणूस तसेच पदाधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करून समन्वयाने काम करा. काही अडचणी आल्यास आपापल्या विभाग प्रमुखांना तसेच मला कळवा. लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य अन्य लोकप्रतिनिधी तसेच सामान्य माणसाच्या पत्रावर सात दिवसात उत्तर देण्याबाबतही त्यांनी सूचित केले. यावेळी सीईओ यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना सांगितल्या. जिल्ह्यातील घरकुलाची कामे करून घेण्यासाठी एसडीएम, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी समन्वय साधून गायरान जमिनीचे नियमितीकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावे. रोहयोची कामे तसेच मातोश्री पानंद रस्ते, वृक्ष लागवड, नाला सरळीकरण तसेच अन्य कामे दोन दिवसात संपवा. मान्सूनपूर्व खोलीकरण करण्यासाठी गाळमुक्त अभियान लोकसहभागातून प्रत्येक तालुक्यात किमान २५ ग्रामपंचायतीमध्ये ही कामे होणे अपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या. मंत्री ग्राम समृद्ध योजनेसह अन्य योजना तात्काळ मार्गे लावा, असेही त्या म्हणाल्या.
तालुकास्तरावर दर मंगळवारी गटविकास अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुकास्तरीय विभाग प्रमुखांसोबत चहाच्या निमित्ताने चर्चा करा, जेणेकरून कामे लवकर होतील. तालुकास्तरावर आदेश काढून शाळा अंगणवाडी या ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय केंद्र उपकेंद्र या ठिकाणी वारंवार विजिट करून स्वच्छतेचा तसेच सर्व विषयांचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या सर्व ठिकाणी नीटनेटके आणि चालू अवस्थेतील शौचालय त्याचा वापर तसेच तेथे वापरण्याच्या व पिण्याच्या पाण्याची पुरेपूर व्यवस्था, मुला-मुलींच्या शौचालयातील दरवाजे, स्वच्छता नीट नसतील तर स्वच्छ करा.






