LPG आणि इंधन तुटवड्याची भीती सोडा! ४० देशांकडून पुरवठा सुरू (photo Credit - X)
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि ऑईल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत देशाच्या इंधन स्थितीचा आढावा मांडला. त्यांनी सांगितले की, “भारत आपल्या गरजेच्या कच्च्या तेलाची आयात केवळ एका क्षेत्रावर अवलंबून न ठेवता सुमारे ४० वेगवेगळ्या देशांतून करत आहे. भारताचा कच्च्या तेलाचा एकूण वापर १८९ दशलक्ष मेट्रिक टन असून रोज सुमारे ५५ लाख बॅरल तेलाची गरज भासते. जागतिक आव्हाने असूनही पुरवठा साखळीत खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे, नुकतेच कच्च्या तेलाचे दोन मोठे कार्गो भारतासाठी रवाना झाले आहेत.”
VIDEO | Delhi: “No need for panic on LPG booking; normal delivery cycle for domestic household remains 2.5 days”, says Joint Secretary in Ministry of Petroleum and Natural Gas Sujata Sharma.#LPG (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/WqalC9mkGn — Press Trust of India (@PTI_News) March 11, 2026
जागतिक राजकारणात संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ वरून होणाऱ्या पुरवठ्याबाबतही सरकारने मोठी माहिती दिली आहे. ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी भारताने पर्यायी मार्ग विकसित केले आहेत. सध्या भारताचे ७० टक्के कच्चे तेल स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यतिरिक्त इतर मार्गांनी देशात पोहोचत आहे. यामुळे प्रादेशिक तणावाचा भारताच्या इंधन पुरवठ्यावर किमान परिणाम होत आहे. तसेच, घरगुती वापराची पीएनजी (PNG) आणि वाहनांसाठी लागणाऱ्या सीएनजीचा (CNG) पुरवठा पूर्णपणे सामान्य असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.
गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमावर बोलताना सुजाता शर्मा म्हणाल्या की, “एलपीजी सिलेंडरसाठी पॅनिक बुकिंग करण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. बुकिंग केल्यानंतर सरासरी अडीच दिवसांच्या (६० तास) आत सिलेंडरची डिलिव्हरी सुनिश्चित केली जात आहे.” जागतिक परिस्थिती आव्हानात्मक असली तरी भारतातील ऊर्जा पुरवठा स्थिर आणि पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.
सध्या होर्मुज क्षेत्रात भारताची एकूण २८ जहाजे असून त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे. यापैकी २४ जहाजे स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या पश्चिम भागात असून त्यावर ६७७ भारतीय खलाशी तैनात आहेत. तर ४ जहाजे पूर्व भागात असून त्यावर ११ भारतीय खलाशी आहेत. या सर्व जहाजांच्या आणि खलाशांच्या हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष असून सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतली जात आहे.






