दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला होता. भाजपला स्व बऴावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नसला तरी देखील एनडीए आघाडीतील घटक पक्षांच्या साथीने सरकार स्थापन केले जात आहे. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा आज राष्ट्रपती भवन येथे पार पडत आहे. यासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची तर 63 खासदार मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र यामध्ये अजित पवार गटाच्या कोणत्याच खासदाराला संधी देण्यात आलेली नाही. यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार यांचे स्पष्टीकरण
अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये एकही मंत्रीपद मिळाले नसल्यावर भावना व्यक्त केल्या. अजित पवार म्हणाले, “आमची मागणी कॅबिनेटसाठी आहे. मात्र राज्यमंत्रिपद मिळत असल्याने ते आम्ही नाकारलं आहे. प्रफुल्ल पटेल याआधी कॅबिनेट मंत्री होते. मी राष्ट्रावादीचा प्रमुख म्हणून सांगितलं की आमची एक जागा जरी निवडून आली असली तरी दोन ते तीन महिन्यात दोन जागा वाढणार आहेत. सर्वांसोबत मी बोललो त्यानंतर कॅबिनेटपद न देता राज्यमंत्रीपद देण्याचं ठरवल्याचं सांगितल. मात्र आमच्या सर्वांचं ठरलं होतं की कॅबिनेटनची जागा प्रफुल्ल पटेल यांना मिळावी. यावर आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं असून इतर घटकपक्षांनाही राज्यमंत्रीपद देणार आहोत. त्यामुळे तफावत केलं तर योग्य राहणार नाही असं सांगण्यात आलं. त्यावर आम्ही त्यांना सांगितलं की कॅबिनेट मंत्री पद द्यावं नाहीतर आमची थांबण्याची तयारी आहे. थांबण्याची तयारी म्हणजे दुसरं काही आमच्या मनात नाही, मनापासून आम्ही एनडीएसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद का नाही?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशाप्रकारची जागा त्यांना देण्यात आली होती. पण त्यांचा आग्रह असा होता की, आमच्याकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही,’ एका घटक पक्षासाठी एनडीएचा नियम बदलता येणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.