नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक जागा देण्यात येणार होती. तसा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला होता. राज्यमंत्री स्वतंत्र्य प्रभार, अशी ही जागी होती. मात्र, त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळावं, असा त्यांचा आग्रह होता. ‘आमच्याकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव अंतिम करण्यात आलं असून ते यापूर्वी मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद देता येणार नाही’, असं राष्ट्रवादीकडून ( अजित पवार गट) सांगण्यात आलं, त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात अजित पवार गटाचा समावेश नसेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा काही निकष तयार केले जातात. एका पक्षासाठी असे निकष मोडता येत नाहीत. त्यामुळे भविष्यात जेव्हाही केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) विचार केला जाईल, यासंदर्भात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी ( अजित पवार गट) बोलणं झालं, तेव्हा आम्हाला यावेळी शक्य नसेल तर पुढच्या वेळी पण केंद्रीय मंत्रीपद द्या, असं सांगण्यात आलं”, असं फडणवीस म्हणाले.