जयपूरमध्ये मोठी बस दुर्घटना; आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, 12 जण गंभीर (Photo : Social Media)
जयपूर : शाहपुरा उपविभागातील मनोहरपूर परिसरात मोठी बस दुर्घटना घडली. मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. तोडी गावातील एका वीटभट्टीवर जाणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी बस 11000 व्होल्टच्या हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली. त्यानंतर काही क्षणातच बसमधून एक जोरदार करंट गेला आणि एका ठिणगीने आग पेटली गेली. काही कळायच्या आतच बसमधील मजूर आगीत अडकले. दोन मजुरांचा यामध्ये जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आणि सुमारे 12 जण गंभीर भाजले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस उत्तर प्रदेशहून कामगारांना तोडी येथील वीटभट्टीत घेऊन जात होती. तेव्हा बसचा वरचा भाग हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आला. त्यामुळे एक शक्तिशाली स्फोट झाला आणि आग वेगाने पसरली. या घटनेमुळे घबराट पसरली. कामगारांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जवळच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.
हेदेखील वाचा : हरियाणात एका शोरूमला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच मनोहरपूर पोलीस स्टेशन आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना तातडीने शाहपुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार दिल्यानंतर, डॉक्टरांनी पाच गंभीर जखमी कामगारांना पुढील उपचारांसाठी जयपूरला रेफर केले. अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि शवविच्छेदनासाठी शवागारात पाठवले आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, बस हाय-टेन्शन लाईनजवळून गेली होती, ज्यामुळे अपघात झाला. प्रशासनाने वीटभट्टी चालक आणि बस चालकाच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.
आंध्र प्रदेशातही मोठी दुर्घटना
दुसरीकडे, आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एक मोठी दुर्घटना घडली. हैदराबादहून बंगळुरूला प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. कुरनूलच्या उपनगरातील चिन्नाटेकुर येथे राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या आगीत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.






