कोलकाता : काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील मतभेद संपताना दिसत नाहीत. बंगालनंतर आता मेघालयातील तुरा लोकसभेसाठी तसेच आसामच्या जागांसाठी उमेदवार जाहीर करणार आहे. लवकरच तिकीट जाहीर होईल, असा दावा केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राज्यात पक्ष काँग्रेसपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. म्हणजे काँग्रेससोबत युती न करण्याची योजना त्यांनी आखली आहे. इंडिया आघाडीसाठी हा पुन्हा एकदा धक्का मानला जाणार आहे. मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांना तुरा लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते. येथून काँग्रेसने यापूर्वीच ए. संगमा यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
यापूर्वी काँग्रेसने बंगालमध्ये युतीसाठी तृणमूलसाठी तुरा जागा सोडण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. परंतु, पश्चिम बंगालमध्ये युती करण्यावर दोघांचे एकमत होऊ शकले नाही.
मुकुल संगमा टीएमसीकडून मैदानात
2019 च्या लोकसभा निवडणुकीत, मुकुल संगमा, जे काँग्रेसमध्ये होते. त्यांना तुरा जागेवर 41.24 टक्के मते मिळाली होती, परंतु एनपीपीच्या अगाथा संगमा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यांनी सुमारे 64,000 मतांच्या फरकाने जागा जिंकली. मुकुल संगमा नंतर काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये ये दाखल झाले.
बंगालमध्ये काँग्रेस डाव्यांशी चर्चा करणार
पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या सर्व 42 उमेदवारांच्या घोषणेसह, कॉंग्रेस आता डाव्या आघाडीसोबत जागावाटपाचा करार अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे. लवकरच त्याची घोषणा होईल, असे मानले जात आहे.






