मणिपूर पुन्हा हिंसेच्या दिशेने! कर्फ्यू, इंटरनेट बंदी आणि 2000 सैनिक दाखल; गोळीबारात महिला ठार (फोटो सौजन्य-X )
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीमुळे तीन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करावी लागली असून इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. लोकांमध्ये अफवा पसरू नयेत यासाठी इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. आता ५ दिवस इंटरनेट बंदी असणार आहे. तर गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यात कुकी आणि मेईतेई समाजातील लोकांमध्ये संघर्ष सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये एकमेकांच्या समाजातील लोकांवर सातत्याने हल्ले होत असल्याचे निर्दशनात आले.
अंतर्गत मणिपूरचे काँग्रेस खासदार ए. बिमोल अकोइजाम यांनी अमित शहा यांना पत्र लिहून अलीकडच्या हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ड्रग्ज माफिया आणि बाहेरील घटकही या अस्वस्थतेला कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी यामागे परकीय कारस्थान असल्याचेही सांगितले आहे. सध्या पुन्हा एकदा हिंसाचाराने मणिपूरमध्ये खळबळ उडवून दिली आहे. यामुळे राज्यातील परिस्थिती कशी आहे ते जाणून घेऊया…
1. मणिपूरच्या उच्च शिक्षण विभागाने 11 आणि 12 सप्टेंबर रोजी सर्व सरकारी आणि खाजगी महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
2. मणिपूरमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन आणि रॉकेटने हल्लेखोरांनी हल्ले केले आहेत. दरम्यान, राज्य पोलिसांनी एटी ड्रोन यंत्रणा तैनात केली आहे. याशिवाय शासनाकडे पुरेशा प्रमाणात नसल्याने त्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
3. गेल्या आठवड्यात मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. त्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मेईतेई समुदायाचे प्राबल्य असलेल्या नुंगचप्पी गावात संशयित कुकी बदमाशांनी हल्ला केला होता. हे गाव इंफाळपासून २२९ किलोमीटर अंतरावर आहे. यानंतर हिंसाचार उसळला.
4. जिरीबाम हा जिल्हा आहे, जिथून शांततेची आशा निर्माण झाली. येथे मेईतेई आणि कुकी समाजाचे नेते बसले होते. त्यांच्यासोबत सुरक्षा दलाचे कमांडरही उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही समाजातील लोकांनी शांततेच्या दिशेने वाटचाल करण्याचे मान्य केले होते, मात्र वाद थांबलेला नाही.
5. शुक्रवारी संध्याकाळी मणिपूर रायफल्सच्या कॅम्पवर बदमाशांच्या जमावाने हल्ला करुन शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी, सुरक्षा दलांनी हवेत गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तेव्हाच हल्लेखोरांवर नियंत्रण मिळवता आले.
6. थौबल जिल्ह्यात सोमवारी पोलिसांची शस्त्रेही चोरट्यांनी हिसकावून घेतली. याशिवाय पोलिसांवरही गोळीबार करण्यात आला.
7. मणिपूरमधील परिस्थिती इतकी बिघडली आहे की, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनीही चिंता व्यक्त केली आहे. इतर राज्यांना याचा फटका बसू नये यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
8. दरम्यान, केंद्र सरकारने CRPF च्या दोन बटालियन मणिपूरला पाठवल्या आहेत. या बटालियनमध्ये एकूण 2000 सैनिक असतील.
9. मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये 92 चौक्या करण्यात आल्या आहेत. येथून बेशिस्त घटकांवर नजर ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक जिल्ह्यातून १२९ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
10. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 225 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 60 हजार लोकांना घरे सोडून स्थलांतर करावे लागले.