नवी दिल्ली : दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून सभागृहात प्रवेश केल्याची घटना घडल्यानंतर संसदेतील परिस्थितीबाबत, तेथे उपस्थित खासदारांनी सांगितले की, संसदेच्या वर्धापनदिनानिमित्त पुन्हा काही दहशतवादी घुसल्याचे त्यांना वाटले. या तरुणांनी तेथे धूर पसरवला तेव्हा ते बॉम्ब फोडत असल्याचा भास झाला. आज वाचणार नाही, असे खासदारांना वाटत होते. त्यामुळे ईश्वराचे स्मरण करायला लागले होते; परंतु धुरानंतर स्फोट न झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
तरुण संसदेत आल्यानंतर दहशतवादी घुसल्याचे वाटत होते. आज कोणीही जिवंत राहणार नाही, असे बसपाचे खासदार मलूक नागर यांनी सांगितले. या तरुणांपैकी एकाला पकडून मारहाण करावी. त्याला अशाप्रकारे पकडले पाहिजे की बॉम्बचा स्फोट झाला तर तो आमच्यासह मरेल, असे विचार मनात आले होते.
समाजवादी पक्षाचे खासदार डिंपल यादव म्हणाल्या की, खासदारांच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, या सरकारला प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे. हा आपला शेवटचा दिवस असू शकतो, असे त्यावेळी लोकसभेत उपस्थित सदस्यांना वाटले. याचे कारण म्हणजे सरकारच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे हे तरुण तेथे पोहोचले. त्यांच्याकडे रासायनिक शस्त्रे असते तर खासदार वाचू शकले असते का? तो चिंतेचा विषय आहे, असे ते म्हणाले.
सरकारने उत्तर द्यावे
भाजपा खासदार प्रताप सारंगी म्हणाले की, दहशतवादी पन्नूने धमकी दिली होती. अशा स्थितीत दहशतवादी संसदेत घुसल्याचे त्यांना वाटले. येथे ते बॉम्बस्फोट करणार आणि त्यानंतर एकही सदस्य वाचणार नाही. हा नक्कीच दहशतवादी हल्ला आहे. संसदेवरील हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण होत असताना संसदेत दहशतवादी घुसल्याचे सर्वांना वाटत होते, असे काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी सांगितले. हा आपला शेवटचा दिवस असल्याचे सर्व खासदारांना वाटले.