Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूरमधील रुग्णालयाच्या ICU विभागात भीषण आग; अनेक रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली : बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. गुरुवारी (दि.४) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. मुझफ्फरपूरच्या सर्वात मोठ्या प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ही आग लागल्याची माहिती दिली जात आहे. या भीषण आगीत 10 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये 15 खाटा होत्या. आगीनंतर परिसरात धुराचे लोट पसरले, ज्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. सध्या 10 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. सुरुवातीला, आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही भीषण आग लागली असावी असा संशय आहे. माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आत अडकलेल्या रुग्णांना इतरांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. बाहेर काढलेल्या अनेक व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला पहाटे ३:५५ च्या सुमारास प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. सहा अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. तर काहींना वाचवण्यात यश आले.
रुग्णालय प्रशासनाने काय म्हटले?
आयसीयूमध्ये रुग्णांसाठी १३ खाटा होत्या आणि आणखी दोन खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आतमध्ये 13 निश्चित रुग्ण दाखल होते आणि आणखी दोन रुग्ण असण्याची शक्यता आहे. तिथे ऑक्सिजन मशीन आणि हार्ट मॉनिटरसह अनेक उपकरणे आहेत. यापैकी एका युनिटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असावी असा संशय आहे. धूर पसरल्याने रुग्णांची प्रकृती अधिकच खालावली. बचावकार्य पूर्ण झाले असून, परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. आयसीयूमधील रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना इतर रुग्णालयांमधील आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.
गौर ग्रीन सोसायटीत भीषण आग
दुसरीकडे, दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील उच्चभ्रू परिसर असलेल्या गौर ग्रीन ॲव्हेन्यू सोसायटीमध्ये बुधवारी (दि.29) सकाळी एका उंच इमारतीच्या आठव्या मजल्यावरून आगीच्या ज्वाला उसळल्याने घबराट पसरली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेली ही आग इतकी भीषण होती की, काही मिनिटांतच आगीने नववा, दहावा आणि अकरावा मजला व्यापला. धुराचे दाट लोट अनेक किलोमीटर दूरवरून दिसत होते.






