महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार (Photo Credit- X)
दिल्लीत विद्यार्थ्यांना दिलेल्या अयोग्य वागणुकीविरोधात आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संयुक्त मोर्चाची रणनीती आणि आराखडा स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे उद्या सकाळी विशेष पत्रकार परिषद घेणार आहे. याआधी मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. आता थेट देशातील तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा खांद्याला खांदा लावून एकत्र येणार असल्याने या संयुक्त मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तरुणांना आक्रमक होण्याचे आवाहन केले आहे. “तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. दिल्ली पोलिसांच्या लाठीमारावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई पोलिसांमध्ये अजूनही संवेदनशीलपणा शिल्लक आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांसारखा विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला नाही.”
आदित्य ठाकरे यांनी तरुणांना आणि नागरिकांना २४ जुलै रोजी चार वाजता शिवाजी पार्क येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “कुठल्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नाही, तर केवळ भारताच्या तिरंग्याखाली एकत्र येऊन सामूहिक राष्ट्रगीत गाऊया आणि विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देऊया,” असे आवाहन त्यांनी केले.
🚨 वन नेशन, वन इमोशन! 🚨 २४ जुलै, शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आमच्यासोबत सामील व्हा! दुपारी ४ वाजल्यापासून आपण सर्वजण तिरंग्याखाली एकत्र येऊया आणि सायंकाळी ५ वाजता आपले राष्ट्रगीत गाऊया. दिल्लीतील अमानुष दडपशाही आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या अटकेच्या… — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 22, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी विद्यार्थ्यांच्या या लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून ते स्वतः मैदानात उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अण्णा हजारे गुरुवारी ‘मौन आंदोलन’ करणार असून त्यांनी केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधण्याची मागणी केली आहे.
अण्णा हजारे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनानुसार, गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अहिल्यानगर येथील वाडिया पार्क परिसरातील महात्मा गांधी स्मारकासमोर ते मौन आंदोलनाला बसणार आहेत. विशेष म्हणजे, दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर आंदोलनाची आठवण म्हणून अण्णा हजारे जिथे आंदोलन करणार आहेत, त्या जागेला प्रतिकात्मक “नगरचे जंतर-मंतर” असे नाव देण्यात येणार आहे. अण्णांच्या या अचानक झालेल्या एंट्रीमुळे केंद्र सरकारवरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.






