खासदार उज्ज्वल निकम यांचे राज्यसभेमध्ये पहिलेच भाषण; कसाबच्या फाशीचा उल्लेख करत अनेक गौप्यस्फोट केले (फोटो - राज्यसभा)
नवी दिल्ली : संसदेमध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. नुकतेच ऑपरेशन सिंदूरवर खास चर्चा सत्र पार पडले आहे. यानंतर आता नुकतेच महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले खासदार उज्ज्वल निकम यांनी पहिले भाषण दिले आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून उज्ज्वल निकम यांना पाठवण्यात आले आहे. त्यानंतर आता राज्यसभेमध्ये उज्ज्वल निकम यांनी पहिले भाषण दिले. आपल्या पहिल्याच भाषणामध्ये निकम यांनी कसाबबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले असून कसाबच्या फाशीचा उल्लेख देखील केला आहे.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
राज्यसभेमध्ये बोलताना खासदार उज्ज्वल निकम म्हणाले की, “मला त्या वेळी सांगण्यात आले की कसाबच्या विरोधात वेगवेगळ्या चार्ज शिट दाखल करण्यास सांगण्यात आले कारण लवकरात लवकर कसाबला फाशी देता येईल. ज्यावेळी होम बेस्ड टेरिरिस्ट दहशतवादी इस्लामबाद एअरपोर्टवर पोहचले. त्याठिकाणी पाकिस्तान सरकारकडून स्थलांतर पॉलिसी रद्द करण्याची व्यवस्था करुन ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट असून देखील इम्बारक्रेशन आणि डीस-इम्बारक्रेशनचे आरोप करता आले नाहीत. त्यांच्याकडे पासपोर्ट असून देखील कारवाई करता आली नाही,” असा गौप्यस्फोट खासदार उज्ज्वल निकम यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उज्ज्वल निकम म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या सरकारने हे स्पष्ट केले आहे की आम्ही फक्त कागदपत्रांमध्ये लढत नाही, तर आम्ही मैदानात उत्तर देतो. भारत आता सहन करत नाही, भारत आता दृढनिश्चय करतो. आता भारत गप्प बसत नाही, भारत थेट प्रत्युत्तर देतो. जो पाकिस्तान एकेकाळी भारताला हलके मानत होता तोच आता भारताच्या प्रतिसादाला घाबरत आहे. हा बदल केवळ धोरणाचा नाही, तर तो नेतृत्व आणि सरकारच्या निर्णायक विचारसरणीचा आहे. तो नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विचारसरणीचा आहे.” असे म्हणत खासदार उज्ज्वल निकम यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, “या दहशतवाद्यांची चौकशी करण्यात आली त्यावेळी त्यांनी कोर्टामध्ये सांगितले की आम्ही गुन्हा कबुल करतो. याचे चार्ज शीट मुंबई पोलीसांनी दाखल केली होती आणि त्यानंतर सर्व तपास हा केंद्रीय तपास यंत्रणांकडे वर्ग करण्यात आला. यावेळी आम्ही रेजिंग वॉर एगन्स्ट गव्हरमेंट ऑफ इंडिया हा चार्ज लावला होता. मात्र केंद्रीय तपास यंत्रणेने हा चार्ज काढून टाकला. तो का काढला,” असा सवाल उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला आहे.
उज्ज्वल निकम म्हणाले की, “आम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानची जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा दहशतवाद्यांच्या बंदुका आपल्या निष्पाप नागरिकांकडे वळल्या, तेव्हा भारताने आपले मौन सोडले आणि ऑपरेशन सिंदूर हे उत्तर नव्हते तर एक संदेश होता. त्यांनी सांगितले की, ही कारवाई केवळ लष्करी दृष्टिकोनातून यशस्वी नव्हती तर राजनैतिक दृष्टिकोनातून परिपक्वता देखील दर्शवते. कोणत्याही निष्पाप नागरिकाचे नुकसान होणार नाही याची आम्ही खात्री केली. एक जबाबदार लोकशाही म्हणून भारताची प्रतिमा आणखी मजबूत होईल याची आम्ही खात्री केली,” असे मत खासदार उज्ज्वल निकम यांनी आपल्या राज्यसभेच्या पहिल्या भाषणामध्ये व्यक्त केले.