पंजाबमधील बटाला येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील समरा गावात एका मुलाने आपल्या वृद्ध आईला काठीने बेदम मारहाण केली. आरोपी मुलगा आपल्या वृद्ध आईकडे पैशांची मागणी करत होता.आईने पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने तिच्यावर काठीने हल्ला करून तिची हत्या केली. जसबीर कौर (६२) असे मृत आईचे नाव आहे. सतपाल असे आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी जसबीर कौरचा मृतदेह ताब्यात घेऊन बटाला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. जेथे शवविच्छेदन केले जाईल. आरोपी मुलगा सतपाल याच्याविरुद्ध श्री हरगोबिंदपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार आहे. या संदर्भात हरगोबिंदपूर पोलीस ठाण्याच्या एसएचओ बलजीत कौर यांनी सांगितले की, मृत जसबीरचा मुलगा रशपाल याने पोलिसांना सांगितले की त्याचे वडील वीज मंडळात होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले होते. यानंतर आईला विभागाकडून काही पैसे मिळाले. त्याची आई जसबीर कौर भाऊ सतपालसोबत राहत होती. सतपालने आई जसबीरकडे काही पैसे मागितले मात्र आईने पैसे दिले नाहीत.
याचा राग येऊन सतपालने आईला काठीने बेदम मारहाण केली. एसएचओने सांगितले की, गुन्हा केल्यानंतर आरोपी सतपाल घटनास्थळावरून पळून गेला. सध्या आरोपी सतपालविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी आरोपीच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.