आता भाजपच झाली काँग्रेसयुक्त; माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा खोचक टोला

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या 'एक्स' या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला असून, भाजप आता काँग्रेसयुक्त झाल्याचा खोचक टोला लगावला.

    भोपाल : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला असून, भाजप आता काँग्रेसयुक्त झाल्याचा खोचक टोला लगावला. आता भाजपानेही दिग्विजय सिंह यांना प्रत्युत्तर दिले आहे.

    भाजप सातत्याने माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यावर हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही आरोप करण्यात मागे हटत नाही. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एक फोटो शेअर करत भाजपावर निशाणा साधला. या फोटोत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासह मंत्री तुलसी सिलावट, काँग्रेसचे माजी आमदार अंतर सिंह दरबार आणि संजय शुक्ला दिसत आहेत.

    यासोबतच इंदूरच्या आमदार मालिनी गौर मुख्यमंत्री मोहन शर्मा यांच्या जवळ दिसत आहेत आणि त्यांच्या मागे सुदर्शन गुप्ता दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे की, मध्य प्रदेश काँग्रेसमुक्त करण्याचा दावा करणारी भारतीय जनता पार्टी काँग्रेसयुक्त झाली आहे.

    भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

    दिग्विजय सिंह यांना जोरदार प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेश प्रवक्ते राजपाल सिंह सिसोदिया म्हणाले, काँग्रेसचे अनेक माजी आमदार, आमदार आणि मोठे नेते पक्ष सोडत आहेत, ही काँग्रेससाठी शरमेची बाब आहे. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला भोगावे लागतील. काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये येण्यामागे दिग्विजय सिंह हेही एक मोठे कारण आहे.