'खासदार नाही, मतदारांचा विश्वास विकला जातोय'; ऑपरेशन टायगरवर अंजली दमानिया यांची खंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजकीय पक्षांपेक्षा लोकशाही आणि मतदारांच्या विश्वासाला महत्त्व देत त्यांनी सध्याच्या घडामोडींवर खंत व्यक्त केली आहे.
अंजली दमानिया यांनी त्यांच्या अधिकृत X (माजी ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले की, “आजचे राजकारण पाहून आत्मा हादरला आहे. मी UBT गटाची समर्थक नाही, तर लोकशाहीची समर्थक आहे. मी याआधी UBT विरोधात कठोर लढे दिले आहेत. मात्र आज जे घडत आहे ते पाहवत नाही.”
दमानिया यांनी काही खासदारांच्या निवडणुकीतील लढतींचा उल्लेख करत मतदारांनी कोणाला पराभूत केले आणि कोणाला निवडून दिले याकडे लक्ष वेधले. त्यांनी नमूद केले की, संजय देशमुख यांनी शिंदे गटाचे हेमंत पाटील, भाऊसाहेब वाकचौरे यांनी सदाशिव लोखंडे आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाचे भाऊराव कदम यांचा पराभव करून विजय मिळवला होता.
आज राजकारण पाहून आत्मा हादरला मी UBT गटाची अजिबात समर्थक नाही मी लोकशाही समर्थक आहे. मी UBT गटा विरुद्ध टोकाचे लढे दिले. पण आज जे होतय ते पाहवत नाही. ह्या ६ खासदार कुणा विरुद्ध लढले: संजय देशमुख हे हेमंत पाटील (शिंदे गट) भाऊसाहेब वाकचुरे हे सदाशिव लोखंडे (शिंदे गट) नागेश… — Mrs Anjali Damania (@anjali_damania) June 17, 2026
“याचा अर्थ मतदारांनी त्या वेळी शिंदे गटाला स्पष्टपणे नाकारले होते. मग आज त्या मतदारांच्या विरोधात जाऊन घेतलेला निर्णय हा त्यांच्या विश्वासाचा भंग नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मतदारांनी मतदान करताना केवळ उमेदवाराला नव्हे तर पक्षाचे चिन्ह, विचारधारा आणि नेतृत्व यांनाही मत दिले होते, असे दमानिया यांनी नमूद केले. त्यांनी पुढे म्हटले की, “मतदारांनी एका चिन्हावर, एका विचारावर आणि उमेदवारावरील विश्वासावर मतदान केले. आज या फोडाफोडीच्या राजकारणात खासदार विकले जात नाहीत, तर मतदारांचा विश्वास विकला जात आहे.”
ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील सहा खासदारांच्या भूमिकेवरून आधीच राजकीय वातावरण तापले आहे. अशातच अंजली दमानिया यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि मतदारांच्या विश्वासाचा मुद्दा उपस्थित केल्याने या वादाला आणखी एक नवा पैलू मिळाला आहे. त्यांच्या प्रतिक्रियेची राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.






