‘गद्दारांना Y+ सुरक्षा, शेतकऱ्यांना अटी,' खासदार फुटीवरून मविआ आक्रमक; रोहित पवार, वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण तापले असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
शिवसेना शिंदेगटाच्या ‘ऑपरेशन टायगर’ च्या अंतर्गत ठाकरे गटातील 6 खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दुसऱ्यांदा पक्षफुटी झाली आहे. या पक्षफुटीनंतर राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावरून आता विविध राजकीय असामींच्या प्रतिक्रिया येत असतानाच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, “वाह रे सरकार तेरा खेल, किसानों को लगा दिया तेल और गद्दारों को बाँट रहा है झालमुरी भेल…!”
वाह रे सरकार तेरा खेल, किसानों को लगा दिया तेल और गद्दारों को बाँट रहा है झालमुरी भेल…! शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना जास्त पैसे खर्च होऊ नये म्हणून अटीशर्ती लावणारं सरकार खोक्यांनी पैसे घेऊन गद्दारी करणाऱ्यांना मात्र जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा देतंय… यातून सरकारला नेमका कोणता… pic.twitter.com/m8qV0cx0y4 — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 18, 2026
पुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अनेक अटी-शर्ती घालणारे सरकार कथित गद्दारांना मात्र जनतेच्या पैशातून Y+ सुरक्षा पुरवत आहे. “यातून सरकार कोणता संदेश देऊ इच्छित आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीसारख्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार गद्दारीला संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस आमदार वर्ष गायकवाड यांनी फुटीर खासदारांना Y प्लस सुरक्षा देण्याच्या कारणावरून जोरदार हल्लाबोल केला. आपल्या ट्विटमधून त्या म्हणाल्या, “मतदारांचा विश्वासघात करा, पक्षाशी गद्दारी करा, सत्तेसाठी भूमिका बदला आणि मग वाय प्लस सुरक्षेच्या कवचात फिरा! जनतेने ज्यांना एका विचारासाठी, एका पक्षासाठी आणि एका भूमिकेसाठी निवडून दिलं, त्यांनीच सत्तेच्या मोहापायी त्या जनादेशाशी बेईमानी केली. आता प्रश्न असा आहे की, अचानक या गद्दारांना एवढ्या कडक सुरक्षेची गरज का भासू लागली? जनतेत जाऊन डोळ्यात डोळे घालून उत्तर देण्याची हिंमत त्यांच्यात उरलेली नाही का?” असं सवाल त्यांनी उपस्थित केला.
मतदारांचा विश्वासघात करा, पक्षाशी गद्दारी करा, सत्तेसाठी भूमिका बदला आणि मग वाय प्लस सुरक्षेच्या कवचात फिरा! जनतेने ज्यांना एका विचारासाठी, एका पक्षासाठी आणि एका भूमिकेसाठी निवडून दिलं, त्यांनीच सत्तेच्या मोहापायी त्या जनादेशाशी बेईमानी केली. आता प्रश्न असा आहे की, अचानक या… pic.twitter.com/68fRQaUgxh — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 18, 2026
त्या पुढे म्हणाल्या, “सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या गद्दारांच्या सुरक्षेचा खर्चही जनतेच्या खिशातूनच केला जाणार आहे. ज्यांनी जनतेचा विश्वास तोडला, जनादेशाशी गद्दारी केली, त्यांच्यासाठी पोलीस यंत्रणा, मनुष्यबळ आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च सामान्य करदात्यांनी का उचलावा? गद्दारी करणाऱ्यांच्या संरक्षणाचं बिल जनतेनेच का भरावं?”
“ईडी, सीबीआय आणि पैशांच्या जोरावर विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजप सरकार लोकशाहीचं नाही, तर गद्दारीचं संरक्षण करत आहे. आज परिस्थिती अशी झाली आहे की, जनादेशाशी बेईमानी करा, सत्ता मिळवा आणि बक्षीस म्हणून वाय प्लस सुरक्षा घ्या!”
“हे अत्यंत दुर्दैवी आहे. कितीही दडपशाही झाली तरी, आम्ही थांबणार नाही. लोकशाही, जनादेश आणि भारतीय संविधानाच्या रक्षणाची लढाई यापुढे अधिक आक्रमकपणे आणि अधिक ताकदीने लढत राहू!” असे आवाहन त्यांनी केले.
ठाकरे गटातील खासदारांच्या भूमिकेवरून सुरू झालेल्या राजकीय संघर्षात आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिक तीव्र होताना दिसत आहे.
‘खासदार नाही, मतदारांचा विश्वास विकला जातोय’; ऑपरेशन टायगरवर अंजली दमानिया यांची खंत






