'ऑपरेशन टायगर'बाबत आम्हाला काहीही माहिती नाही, आमच्या नेत्यांना...; बावनकुळे यांचं मोठं विधान
मुंबई : आम्हाला टायगरच माहीत नाही, कुणी आणले हेदेखील माहित नाही, फोडाफोडीशी भाजपचा काहीही संबंध नाही, असा दावा करून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिक बोलणं टाळलं. ऑपरेशन टायगरबद्दल मला काहीही माहिती नाही. ऑपरेशन टायगर का आहे?, त्याचे नाव काय? याची काहीही कल्पना नाही.
याबाबत उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच माहिती आहे. भाजपचा या विषयाशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे भाजप किंवा आमच्या नेत्यांना यात गोवणे योग्य नाही. आमच्या नेत्यांबद्दल टीकाटिप्पणी करणे योग्य नाही, असे बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा आणि एकनाथ शिंदे यांनी पक्ष वाढवावा, याबद्दल कुणाचीही ना नाही. आमदार, खासदार का सोडून चालले याचे ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला देऊन बावनकुळे यांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) फोडाफोडीशी भाजपचा कुठलाही संबंध नाही, असा दावा केला.
टंचाईचे नियोजन, पेयजलासाठी राखीव
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने राज्याच्या पाणी स्थितीचा आढावा घेतला. आता जास्तीत जास्त पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाबद्दल चर्चा नको
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हा शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सक्षम आणि लोकप्रिय नेते आहे. ते दिल्लीत राहतील की मुंबईत हे माझ्या हातात नाही. राज्याच्या सर्वंकश विकासासाठी त्यांना मुख्यमंत्री केले आहे. फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याची जोरदार प्रगती सुरू आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्रिपदाबद्दल चर्चा करणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले.
आता आमदारांना केले जाणार लक्ष्य?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राबवलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातून सहा खासदारांनी बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करणे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्याला मान्यता देणे, या घडामोडींनंतर आता राजकीय लक्ष आमदारांकडे वळले आहे.






