संग्रहित फोटो
पुणे : किरकोळ कारणातून झालेल्या वादात चौघांनी तरुणावर धारधार शस्त्राने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून खूनाचा प्रयत्न केला आहे. ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास ए. एस. प्रो गोडाऊन कोंढवा येथे घडली आहे. राहुल शितोळे (वय २३, रा.महादेवनगर कात्रज) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. शितोळेने तक्रार दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी पप्पु गोवेकर आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार शितोळे आणि गोवेकर हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गोवेकर व साथीदारांनी शितोळेला त्यांच्या एका मित्राबाबत विचारणा केली. तो त्यांना सापडत नव्हता. त्यावेळी शितोळे याने आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले. त्या कारणातून त्यांच्यात वाद झाला असता, आरोपी टोळक्याने शितोळेंच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केला. तसेच मारहाण करत त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पुण्यात पार्किंगवरून वाद
रहिवाशी इमारतीच्या पार्किंगसमोर लावलेला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून वादविवाद झाल्यानंतर रिक्षा चालकाने तरुणाच्या पोटात तीक्ष्ण हत्यार घुपसून खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या मानेवर व हातावर देखील वार केल्याने तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात रिक्षाचालक सोमनाथ हनुमंत पवार (वय ३३, रा. शिवणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संदीप देसाई (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. या हल्यात संदीप गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडे आकराच्या सुमारास घडली.