PM नरेंद्र मोदींनी मागितली जनतेची माफी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील नागरिकांची माफी मागितली. “ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यात आपण असमर्थ आहे ” असं म्हणत त्यांनी माफी मागितली आहे. माफी मागतानाच त्यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकार आणि दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (AAP) सरकारवर आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी न केल्याबद्दल टीका केली. “दिल्ली आणि बंगालमधील वृद्धांना आयुष्मान भारतचा लाभ मिळवता येणार नाही कारण त्यांच्या सरकारांनी राजकीय कारणांसाठी याची अंमलबजावणी केली नाही,” असं मोदींनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट नागरिकांची माफी मागितली आहे.
हेही वाचा- Baramati Assembly Constituency : पवारांच्या लढाईत अभिजीत बिचुकलेंची उडी; बारामतीतून लढणार निवडणूक
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती ७० वर्षांर्यंत वाढवण्यात आली आहे. ७० वर्षांवरील लोकांना रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळतील; त्यांना ‘आयुष्मान वाया वंदना’ कार्ड दिले जाईल,” अशी माहिती मोदींनी दिली. ही माहिती देतानाच दिल्ली आणि बंगालमधील ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी त्यांची माफी मागितली. “मी दिल्लीमधील आणि पश्चिम बंगालमधील ७० वर्षांवरील सर्व वृद्ध नागरिकांची माफी मागतो की मी तुम्हाला सेवा देऊ शकणार नाही. मी तुमच्या प्रकृतीची माहिती घेईन, परंतु तुमच्या मदतीसाठी मी सक्षम नाही, कारण दिल्लीतील आणि पश्चिम बंगालमधील सरकार या आयुष्मान योजनेमध्ये सहभागी होत नाहीत.
हेही वाचा-Parvati Constituency Politics: माधुरी मिसाळ की अश्विनी कदम; कसे आहे पर्वतीचे राजकीय समीकरण?
“तुमच्या राज्यातील रुग्णाना राजकीय स्वार्थांसाठी योजनांचा लाभ मिळू देण्याची प्रवृत्ती कोणत्याही मानवतेच्या दृष्टिकोनाला चुकीची आहे. म्हणूनच मी पश्चिम बंगालमधील आणि दिल्लीतील ज्येष्ठ नागरिकांची माफी मागत आहे. मी देशातील जनतेला सेवा देऊ शकतो, पण राजकारणाच्या भिंतींमुळे मी दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील वृद्धांना सेवा देऊ शकत नाही,”
आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांचं खंडन करत योजनेतील निकष चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. आयुष्मान भारत योजना राष्ट्रीय राजधानीतील एकाही नागरिकाला लाभ देऊ शकत नाही, या योजनेचे निकष चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले आहेत. “जर तुमच्याकडे एक रेफ्रिजरेटर, एक दुचाकी असेल किंवा तुमचं उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा अधिक असेल, तर तुम्ही आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, असं AAP नेते संजय सिंग यांनी सांगितलं. ही योजना भाजपच्या नेत्तृत्वाखालील सरकारचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या योजनेतून किती जणांना लाभ मिळाला याचा हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील डेटा मागितला आहे, तो आला की यात किती मोठा घोटाळा आहे हे जनतेसमोर येईल, असा दावा त्यांनी केला आहे. ज्यामुळे कथित फसवणूक उघड होऊ शकते.