'त्या असत्या तर आज 12 लाखांवर 10 लाखांचा कर लावला असता': दिल्लीतून PM मोदींचा हल्लाबोल
मोदी सरकारच्या तिसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प काल अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. अर्थसंकल्पात मध्यवर्गाला दिलासा देणारी घोषणा करण्यात आली. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करण्यात आला. दरम्यान ५ तारखेला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपसह काँग्रेसवर निशाना साधला.पंडीत नेहरूंच्या काळात 12 लाख रुपये कमावले असते तर 12 लाखांच्या उत्पन्नावर सरकारने तुमच्या पगाराचा एक चतुर्थांश हिस्सा घेतला असता आणि इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी 12 लाखांवर उत्पन्नावर 10 लाखांचा कर लावला असता, असा टोला लगावला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘यावेळी दिल्लीत भाजपचं सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीच्या ‘आपत्ती’ पक्षाने येथे ११ वर्षे वाया घालवली. मी दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाला विनंती करतो की त्यांनी मला राज्यातील दिल्लीतील लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी. मी हमी देतो की तुमच्या प्रत्येक समस्येचे आणि अडचणीचे निराकरण करण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. आपल्याला असे सरकार स्थापन करावे लागेल जे दिल्लीची सेवा करेल, जे सबबी सांगण्याऐवजी दिल्लीला शोभेल. आता, चुकूनही ‘आपत्ती’ असलेलं सरकार इथे येऊ नये.
‘मतदानापूर्वीच झाडूचे काटे कसे विखुरले जात आहेत.’ आपचे नेते सोडून जात आहेत. त्यांना कळलं आहे की लोक किती संतापले आहेत आपवाले दिल्लीतील लोकांच्या रोषाला इतकं घाबरले आहेत की दर तासाला खोट्या घोषणा करत आहेत. आपत्ती निर्माण करणाऱ्यांचा मुखवटा समोर आला आहे. गेल्या १० वर्षांपासून ते त्याच खोट्या घोषणांवर पुन्हा पुन्हा मते मागत आहेत. आता आम्ही हा खोटेपणा सहन करणार नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी सर्व पक्ष आपले सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आरके पुरममध्ये एक सभा घेतली. यावेळी ते म्हणाले ‘दिल्लीत एकही झोपडपट्टी पाडली जाणार नाही.’ खरं तर, गेल्या अनेक दिवसांपासून अरविंद केजरीवाल त्यांच्या जाहीर सभांमध्ये आरोप करत आहेत की जर भाजप सत्तेत आला तर ते झोपडपट्ट्या पाडल्या जातील. यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुकीत झोपडपट्ट्यांचा मुद्दा बराच चर्चेत आला आहे.
दिल्लीत एकही झोपडपट्टी पाडली जाणार नाही. दिल्लीत कोणतीही लोककल्याणकारी योजना थांबवली जाणार नाही. आम्ही ‘आप’ प्रमाणे केवळ घोषणा करण्यासाठी घोषणा करत नाही, तर आम्ही अर्थसंकल्पात त्यासाठी व्यवस्था देखील करतो, असं मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान म्हणाले, ‘हे आप-दा लोक अफवा पसरवत आहेत पण लक्षात ठेवा, दिल्लीत एकही झोपडपट्टी पाडली जाणार नाही.’ कोणतीही लोककल्याणकारी योजना थांबवली जाणार नाही. मला पूर्वांचल आणि बिहारमधील बंधू आणि भगिनींकडून संदेश येत आहेत. मोदी पूर्वांचलमधून खासदार झाले आहेत म्हणून त्यांचे मेसेज येत आहेत.’कोविडच्या नावाखाली, पूर्वांचलमधील लोकांना दिल्लीतून हाकलून लावले जात आहे. भाजप सरकार पूर्वांचल आणि बिहारमधील लोकांना मदत करत राहील. कालचा अर्थसंकल्प मध्यमवर्गासाठी अनुकूल असल्याचं ते म्हणाले.