पाच देशांचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी परतले मायदेशी; 'या' घडामोडी ठरल्या चर्चेचं कारण (फोटो सौजन्य: एक्स/@narendramodi)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत अनेक परदेश दौरे केले आहेत. त्यातच नुकताच त्यांनी पाच देशांचे दौरे केले आहेत. यामध्ये काही प्रमुख घडामोडी चर्चेचं कारण ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांचा दौरा करून परतले आहेत. गुरुवारी सकाळी त्यांचे विमान पालम विमानतळावर उतरले.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आठ दिवसांच्या दौऱ्यात घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांना भेट दिली. ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेतही त्यांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा 2 जुलैला घानाला पोहोचले होते. येथे पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदींनी घानाच्या संसदेला संबोधित केले. तब्बल तीन दशकांनंतर भारतीय पंतप्रधानाने घानाला भेट दिली आहे. त्यामुळे हा दौरा चर्चेचा विषय ठरला.
हेदेखील वाचा : Marathi Controversy : मराठी भाषेबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय; राजभाषा समितीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या परदेश दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिना येथे पोहोचले होते. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष जेवियर मायले आणि या देशातील अनेक फुटबॉल खेळाडूंनाही भेट दिली. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजधानी ब्यूनस आयर्समध्ये स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकत्र बैठक घेतली.
‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो’ने सन्मानित
घानाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅरिबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे पोहोचले. राजधानी ‘पोर्ट ऑफ स्पेन’ येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्षा क्रिस्टीन कांगालू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो’ प्रदान केला. त्यांनी येथे संसदेला संबोधित केले.
सहा करारांवर स्वाक्षऱ्या
भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यात सहा महत्त्वाचे करार झाले आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यातील बैठकीनंतर, दोन्ही देशांनी पायाभूत सुविधा विकास, औषधनिर्माण आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शविली आहे.