पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद;
नवी दिल्ली : देशभरात जेन-झी आणि जेन-अल्फाच्या आंदोलनांच्या घटना सातत्याने समोर येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये जेन-झीशी थेट संवाद साधणार आहेत. या संवादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. यापैकी अनेक राज्यांमध्ये जेन-झी आणि जेन अल्फाकडून स्थानिक सरकारविरोधात संघर्ष, धरणे आणि आंदोलने केली जात आहेत.
तसेच तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये भाजपची लोकप्रियता वेगाने कमी होत असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जेन-झीसोबतचा हा संवाद दिल्लीतील प्रतिष्ठित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये होणार आहे. दिल्ली विद्यापीठाच्या उत्तर परिसरात असलेले हे महाविद्यालय यंदा स्थापनेचे १००वे वर्ष साजरे करत आहे. महाविद्यालयाने यानिमित्त शताब्दी वर्षाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्यान, या महाविद्यालयाने देशाला अनेक नेते, नोकरशहा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वे दिली आहेत. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात केवळ संबोधन करणार नसून, काही विद्यार्थ्यांचे प्रश्नही घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि तरुण वर्गाशी भाजपचा थेट संवाद साधणारा हा मोठा कार्यक्रम मानला जात आहे.






