File Photo : Court Decision
कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta High Court) कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय नुकताच रद्द केला. त्यामध्ये एका व्यक्तीने घटस्फोटानंतर लग्नाचे वचन देऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं होतं. पण कोलकाता उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करून घटस्फोटानंतर लग्नाचे वचन देऊन प्रस्थापित झालेले शरीरसंबंध म्हणजे फसवणूक नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले की, एखाद्या व्यक्तीने पहिल्या विवाहाच्या घटस्फोटानंतर लग्नाचे वचन देऊन एखाद्या स्त्रीशी शरीरसंबंध प्रस्थापित केले असेल तर त्या व्यक्तीविरोधात फसवणूक झाल्याचा आरोप करता येणार नाही. कारण ज्या महिलेसोबत त्याने संबंध प्रस्थापित केले होते. त्या महिलेने भविष्यातील अनिश्चितता जाणून त्याला संमती दिली होती. म्हणून त्या व्यक्तीला दोष देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
एका महिलेने आरोपीविरोधात तक्रार देत खटला दाखल केला की, लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आरोपीला दोषी ठरवून 10 लाख रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. यातील 2 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून पीडितेला आणि 8 लाख रुपये त्याच्या शिक्षेचा भाग म्हणून राज्य सरकारच्या तिजोरीत जमा करावयाचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयाविरोधात आरोपीने वरच्या कोलकाता उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला.






