संग्रहित फोटो
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेली टीका निरर्थक आहे. इंदिरा गांधी, राजीवजी गांधी यांचाही निवडणुकीत पराभव झाला पण त्यानंतर काँग्रेस पक्ष नव्या जोमाने व ताकदीने उभा राहिला. काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि जनतेचा काँग्रेसवर विश्वास आहे, त्यामुळे काँग्रेस संपेल, काँग्रेसचे तुकडे पडतील अशा टीकेला काहीही अर्थ नसून काँग्रेस कधीच संपत नाही, असे चोख प्रत्युत्तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिले.
मुंबई काँग्रेसचे एक दिवसीय शिबीर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, ज्योती गायकवाड यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बिहार विधानसभेचे निकाल उलटे लागले असते तर आजचा उत्साह अधिक वाढला असता पण पराभव झाला म्हणून खचून जावू नका. काँग्रेस कार्यकर्त्याने पुन्हा नव्या जोमाने व ताकदीने कामाला लागले पाहिजे. रडायचे नाही तर लढायचे हा बाणा अंगी बाळगला पाहिजे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजयी झेंडा फडवण्यासाठी ताकदीने कामाला लागा, असे आवाहन सपकाळ यांनी केले.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आणि दिपस्तंभासारखे राहुल गांधी यांचे नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे आहे. नफरत छोडो, भारत जोडो हा नारा देत भयमुक्त समाजासाठी त्यांनी देशभर पदयात्रा काढली. संविधानाचे संरक्षण व संवर्धन हे राहुल गांधी यांचे स्वप्न आहे. संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. निवडणूकीत हार जीत होतच असते पण सत्ता नाही म्हणून थांबून चालणार नाही. नकारात्मकता सोडून द्या व लढाऊ बाणा अंगी बाळगा, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.






