फोटो - सोशल मीडिया
नवी दिल्ली : सध्या देशाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विविध मुद्द्यांवर जोरदार चर्चा सुरु असून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी व विरोधी खासदार आरोपांच्या फैरी झाडत आहेत. दरम्यान, राज्यसभेमध्ये गदारोळ झाला असून कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या अपात्रतेवरुन चर्चा सुरु असताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी सभागृहामध्ये अत्यंत गोंधळ झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मी सक्षम नसल्याचे म्हणत सभात्याग केला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला फायनल मॅचमधून अपात्र करण्यात आले. स्पर्धेला अवघे काही तास शिल्लक असताना अपात्र करण्यात आल्यामुळे सर्वच भारतीयांना मोठा धक्का बसला. सभागृहामध्ये देखील याचे पडसाद दिसून आले. विरोधकांनी या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. विनेश फोगट अपात्र का ठरली? त्यामागे कोणती कारणे होती? या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सभापतींनी दैनंदिन कामकाजादरम्यान या चर्चेस नकार दिला. त्यामुळे विरोधकांनी एकच गोंधळ घातला. यामुळे सभागृहातील वातावरण बिघडले. त्यामुळे सभापती जगदीप धनखड यांनी सदस्यांवर नाराजी व्यक्त करत त्यांची खुर्ची सोडली.
काय म्हणाले जगदीप धनखड?
विनेश फोगाट हिच्या अपात्रेबाबत चर्चा करण्यास नकार देताना सभापती जगदीप धनखड म्हणाले, विरोधकांना वाटते की, फक्त त्यांनाच दुःख झाले आहे. विनेश फोगट पदकाला मुकल्यानंतर संपूर्ण देश हळहळला. या मुद्द्याचे राजकारण करून विरोधकांनी विनेशबद्दल अनादर व्यक्त केला आहे. हरियाणा सरकारकडून तिचा पदकविजेत्या समान सन्मान केला जाणार आहे, असे देखील सभापतींनी नमूद केले. मात्र तरी देखील विरोधकांनी आपली मागणी लावून धरली. यावेळी विरोधकांनी सभागृहामध्ये घातलेला गोंधळ व वर्तन त्यांना आवडले नाही आणि सभापतींनी सभात्याग केला.
#WATCH | Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar stopped presiding over the House for a brief while and left the House saying that he did not “get the support he should have received.”
He said, “Making this sacred House a centre of anarchy, attacking Indian democracy, tarnishing… pic.twitter.com/07iVVL0935
— ANI (@ANI) August 8, 2024
विरोधकांनी सभागृहामध्ये गोंधळ घातल्याने सभापती धनखड नाराज झाले. त्यांनी हे वर्तन योग्य नसल्याचे म्हणत या पवित्र सदनाला अराजकताचे केंद्र बनवणे हे अतिशय चुकीचे आहे. देशाच्या लोकशाहीबाबत सभापती व्यथित होऊन म्हणाले, सभागृहामध्ये चिथावणीपूर्ण वक्तव्य करणे आणि अध्यक्षांचा अनादर करणे हे अतिशय वाईट वर्तन आहे. तसेच तुम्ही (जयराम रमेश) हसू नका. मला तुमची सवय माहिती आहे. काही खासदार चुकीची वक्तव्ये करत आहेत. मी तुमच्या सर्वांचा आदर राखतो. पण आज तुम्ही जो काही गोंधळ घालत आहात, त्यानंतर मी व्यथित झालो आहे, असे म्हणत सभापती जगदीप धनखड यांनी सभात्याग केला आहे. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज स्थगित झाले आहे.