Photo Credit- Team navrashtra
हरियाणा: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. तिकीट नाकारल्यानंतर भाजपचे विद्यमान आमदारामध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. मनोहर लाल आणि नायब सरकारचे मंत्री रणजितसिंह चौटाला ते आमदार लक्ष्मण नापा यांच्यापर्यंत बिगुल वाजवले आहे. तिकीट जाहीर झाल्यापासून भाजपच्या जवळपास 32 नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे दोन डझन जागांवर भाजपचे राजकीय समीकरण अडचणीत आले आहे. त्यामुळे पक्षाने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे.
भाजपने बुधवारी 67 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली असून त्यात तीन मंत्र्यांसह 9 आमदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. भाजपने 40 जागांवर नवे चेहरे उतरवले आहेत. तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या वीजमंत्री रणजित सिंह चौटाला, आमदार लक्ष्मण नापा, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुखविंदर शेओरान, प्रदेश उपाध्यक्ष जीएल शर्मा, सतीश खोला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय मंत्री बिशंभर वाल्मिकी, माजी मंत्री कविता जैन, सावित्री जिंदाल आणि लतिका शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली.
हेदेखील वाचा: Maharashtra Election 2024: भाजप लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ॲक्शनमोडमध्ये; ‘या’ शिलेदारांना उतरवणार
यावेळी हरियाणात भाजपला आधीच सत्ताविरोधी लाटेच्या आव्हानांचा सामना करावा लागत असून आता तिकीट न मिळाल्याने नेत्यांच्या नाराजीने तणाव वाढला आहे. त्यामुळेच भाजपचे नेतृत्व डॅमेज कंट्रोलमध्ये व्यस्त आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीचे सहप्रभारी बिप्लब कुमार देब यांनी रोहतक येथील पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली आणि नाराज नेत्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी चार वरिष्ठ नेत्यांवर सोपवली आहे. यानंतरही भाजपच्या अनेक नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
– कुरुक्षेत्रातील भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या आई सावित्री जिंदाल यांनी हिसार विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
– रानिया विधानसभा मतदारसंघातून भाजपने आमदार आणि वीजमंत्री रणजित सिंह चौटाला यांचे तिकीट रद्द केले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
-रतिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार लक्ष्मण नापा यांनी तिकीट नाकारल्यामुळे पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसमध्येही प्रवेश केला आहे.
हेदेखील वाचा: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आमदार सरनाईक यांच्यातर्फे गणेशोत्सवानिमित्त कोकणात
– माजी मंत्री कर्णदेव कंबोज यांनीही रादौर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
– सफिदोन विधानसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने भाजपचे दिग्गज नेते आणि माजी आमदार जसबीर देशवाल यांनी पक्ष सोडला. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे.
– उकलाना विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीमा गबीपूर यांनी पक्षाला अलविदा केला आहे.
– भाजपचे माजी आमदार शशी रंजन परमार यांना तोशाम मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, मात्र श्रुती चौधरी यांच्या नावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे.
– अटेली मतदारसंघातून तिकिटावर दावा करणारे भाजप ओबीसी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि पंचायत संघटनेचे माजी अध्यक्ष कुलदीप यादव यांनी बंडखोरी केली आहे.
– सामलखा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढलेले शशिकांत कौशिक भाजपकडून तिकीट न मिळाल्याने नाराज आहेत. तसेच मुल्लाना माजी आमदार राजबीर बरडा यांच्या समर्थकांनीही नाराजी व्यक्त केली.