Punjab, Delhi Flood News: उत्तर भारतातील तीन राज्यांमध्ये राजधानी दिल्ली, पंजाब आणि हिमाचल प्रदेश याठिकाणी पावसाने कहर केला आहे. गेल्या १४ वर्षांत सलग दोन आठवडे इतका पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या काळात उत्तर भारतात सरासरी पावसापेक्षा सुमारे तीन पट जास्त पाऊस पडला पडल्याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. या काळात जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णोदेवी मार्गावर ढगफुटी, पंजाबमध्ये दशकांनंतरचा सर्वात मोठा पूर, यमुनेची पाण्याची पातळी दिल्लीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणे आणि हिमाचल- उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन अशा घटना घडल्या आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार, या १४ दिवसांत उत्तर भारतात सरासरी २०५.३ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. सामान्यतः दरवर्षी या ठिकाणी पाऊस फक्त ७३.१ मिमी असतो. म्हणजेच संपूर्ण मान्सूनच्या कोट्याच्या ३५% पाऊस फक्त दोन आठवड्यांच्या पावसाने पूर्ण झाला.
१ जून ते ४ सप्टेंबर या कालावधीत उत्तर भारतात ६९१.७ मिमी पाऊस पडला असून, जो सामान्यपेक्षा ३७ टक्के जास्त आहे. जर उर्वरित सप्टेंबरमध्ये सामान्य पाऊस पडला तर हा आकडा ७५० मिमी पेक्षा जास्त होऊ शकतो. १९८८ नंतरचा हा दुसरा सर्वात जास्त पाऊस असलेला मान्सून असेल.
१९८८ मध्ये सर्वाधिक पाऊस ८१३.५ मिमी इतका होता आणि १९९४ मध्ये ७३७ मिमी होता. या वर्षीचा मान्सूनने दोन आठवड्यातचं हे रेकॉर्ड मागे टाकले आहेत.हवामानशास्त्रज्ञांच्या मते, हा सततचा पाऊस दोन हवामान प्रणालींच्या टक्करमुळे झाला आहे. एकीकडे, पश्चिमी विक्षोभामुळे भूमध्य समुद्राजवळून ओले वारे आले आणि दुसरीकडे ते पूर्वेकडील मान्सूनच्या वाऱ्यांशी धडकले. यामुळे इतका पाऊस झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पहिली टक्कर २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान झाली आणि दुसरी टक्कर २९ ऑगस्टपासून सुरू झाली आणि ४ सप्टेंबरपर्यंत चालू राहिली. जुलै-ऑगस्टच्या पावसाळ्यात अशा दुहेरी टक्करी क्वचितच पाहायला मिळतात, परंतु यावेळी त्या सलग घडल्या. त्याचा सर्वाधिक परिणाम डोंगराळ राज्यांमध्ये दिसून आला. पंजाबमध्ये ३८८% आणि नंतर सामान्यपेक्षा ४५४% जास्त पाऊस पडला. त्याचप्रमाणे, हरियाणा-चंदीगड-दिल्लीमध्ये ३२५%, हिमाचलमध्ये ३१४%, पश्चिम राजस्थानमध्ये २८५%, जम्मू-काश्मीरमध्ये २४०% आणि उत्तराखंडमध्ये १९०% जास्त पाऊस पडला.
दिल्लीसह हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्येही पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसानंतर दिल्लीत यमुना नदीला पूर आला आहे. यमुना नदी ओसंडून वाहत असल्याने अनेक भागात घरे पाण्याखाली गेली आहेत. दुकानांमधील सामान उद्ध्वस्त झाले आहे, वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे हजारो लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. नदीची पाण्याची पातळी २०७ मीटर ओलांडली, जी १९६३ नंतर पाचवी वेळ आहे. निगमबोध घाटात पुराचे पाणी शिरले, ज्यामुळे दिल्लीतील सर्वात जुन्या आणि व्यस्त स्मशानभूमीत अंत्यसंस्कार प्रक्रिया थांबवावी लागली.
दुसरीकडे, पंजाबमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. बुधवारी (३ सप्टेंबर) पुरामुळे मृतांचा आकडा ३७ वर पोहोचला आहे, तर २३ जिल्ह्यांमधील १.७५ लाख हेक्टर जमिनीवरील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. गावे पाण्याखाली गेली आहेत. गुरांचे मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून जात आहेत. १९८८ नंतर राज्यातील हा सर्वात मोठा पूर मानला जात आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे, तर १,६५५ गावांमध्ये अडकलेल्या ३.५५ लाखांहून अधिक लोकांना मदत करण्यासाठी विविध संस्थांकडून मदत पोहोचत आहे.
मुसळधार पावसामुळे प्रशासनाने रूपनगर आणि पटियाला जिल्ह्यात अलर्ट जारी केला आहे. लोकांना घरात सुरक्षित राहण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याच वेळी, परिस्थिती लक्षात घेता, राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे ७ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सतलज, बियास आणि रावी नद्यांची पाण्याची पातळी अधिक धोकादायक बनली आहे. या नद्या आणि हंगामी नाल्यांच्या पुरामुळे शहरे आणि गावे पाण्याखाली गेली आहेत, ज्यामुळे सामान्य जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.