बलरामपूर : समाजवादी पक्षाचे माजी आमदार आरिफ अन्वर हाश्मी (Arif Anwar Hashmi) यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन बळकावल्याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी माजी आमदाराला अटक केली होती.
आरिफ अन्वर हाश्मी यांची एक कोटी 50 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ती त्यांनी बनावट पद्धतीने बेकायदेशीरपणे मिळवली होती. हाश्मी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर उत्रौला मतदारसंघातून दोनदा आमदार राहिले आहेत. आरिफ अन्वर हाश्मीला जिल्हा प्रशासनाने भूमाफिया टोळीचा म्होरक्या म्हणून घोषित केले आहे. बनावट कागदपत्रे तयार करून खासगी व सरकारी जमिनी बळकावण्याचे डझनावर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्यामुळे आरिफ अन्वर हाश्मीला दोन वर्ष तुरुंगवास भोगावा लागला असून, जिल्हा प्रशासनाने त्याची मालमत्ताही जप्त केली आहे.
माजी आमदार आरिफ अन्वर हाश्मी आणि त्यांच्या भावांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मौल्यवान सरकारी जमीन खोट्या कागदपत्राच्या आधारे आपल्या नावे नोंदवली होती. ग्रामस्थांकडून याबाबत माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी उत्रौला यांनी आपल्या आदेशात फसवणूक केलेली जमीन शासनाकडे परत केली. लेखपाल सुनील कुमार यांच्या तक्रारीवरून 14 जून 2023 रोजी माजी आमदार आरिफ अन्वर हाश्मी यांच्याविरुद्ध सदुल्ला नगर पोलिस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आधारे पोलिसांनी हाश्मीला अटक केली.