निपाणी : राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Mandir Inauguration) सोहळ्याचा वापर भाजप (BJP) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आपल्या राजकारणासाठी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. निपाणीमधील कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? असा सवाल देखील शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राजकारणासाठी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा वापर होत असल्याचा घणाघात केला. शरद पवार म्हणाले, श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर आहे. मशीद पडल्यानंतर तिथं राम मंदिर बांधण्याचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळी झाला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शिलानेस झाला. राम मंदिराचे काम राहिले बाजूला, मात्र आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी फायदा करून घेत आहेत. राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? मोदी 10 दिवस उपवास करत आहेत. तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा” असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
पुढे शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवरुन सरकारला घेरले. शरद पवार म्हणाले, या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात. पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात आहेत. मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. पण आज देखील शेतकरी कर्जात आहे. कर्जमाफीसाठी आम्ही या सरकारकडे वारंवार प्रयत्न करतोय. मात्र धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका शरद पवार यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारवर केली आहे.