भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेणाऱ्या पंतप्रधानाने पद सोडावे का? केजरीवांनी शाहांना आरसा दाखवला
New Delhi : केंद्र सरकारच्या १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकामुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच आज सकाळी ANIया वृत्तसंस्थेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मुलाखत दिली. त्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक झाल्यानंतर त्यांच्या पदावरून काढून टाकण्याच्या विधेयकावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “जो व्यक्ती गंभीर गुन्ह्यांच्या आरोपींना आपल्या पक्षात समाविष्ट करतो आणि त्यांचे सर्व खटले निकाली काढतो आणि त्यांना मंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री बनवतो, अशा मंत्र्याने/पंतप्रधानानेही आपले पद सोडावे का? अशा व्यक्तीला किती वर्षांची शिक्षा व्हावी?” असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंस्टाग्रामवर अमित शाहांबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. “जर एखाद्यावर खोटा खटला दाखल केला गेला आणि त्याला तुरुंगात पाठवले गेले आणि नंतर तो निर्दोष सुटला, तर त्याच्यावर खोटा खटला दाखल करणाऱ्या मंत्र्याला किती वर्षांची शिक्षा व्हावी?” असही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले होते की, “तुरुंगात बसून कोणताही माणूस देश चालवू शकत नाही. पण तुरुंगात बसूनही आपण सरकार चालवू शकतो आणि स्थापन करू शकतो, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. गंभीर गुन्हेगारी आरोपांमध्ये अडकलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून हटवण्यासाठी १३० व्या घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आले आहे.
तसेच यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरही भाष्य केले होते. “जेव्हा केजरीवाल तुरुंगात असल्याचा खटला उच्च न्यायालयात गेला तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. न्यायालयानेही त्यांना नैतिकतेच्या आधारावर त्यांनी पद सोडण्यास सांगितले होते. सध्याच्या कायद्यात त्यांना पदावरून काढून टाकण्याची कोणतीही तरतूद नाही.
IT शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे बाजारात तेजी, सेन्सेक्स ३२९ अंकांनी वधारला, निफ्टी २४९६७ वर बंद
यासंदर्भात बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ”जेव्हा केंद्र सरकारने मला राजकीय कट रचून खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवले, तेव्हा मी १६० दिवस तुरुंगातून सरकार चालवले. गेल्या सात महिन्यांत दिल्लीच्या भाजप सरकारने दिल्लीची अशी अवस्था केली आहे की आज दिल्लीतील लोकांना त्या तुरुंगातील सरकारची आठवण येत आहे. किमान तुरुंग सरकारच्या काळात वीज कपात नव्हती, पाणी उपलब्ध होते, रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत औषधे उपलब्ध होती, मोफत चाचण्या केल्या जात होत्या, दिल्लीची स्थिती एका पावसात इतकी वाईट नव्हती, खाजगी शाळांना मनमानी आणि गुंडगिरीने वागण्याची परवानगी नव्हती.” असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.