नवी दिल्ली : दूरसंचार विभागाने सिमकार्ड खरेदी आणि विक्रीसंबंधीच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे जर तुम्ही सिमकार्ड खरेदी किंवा विक्री करणार असाल तर या नियमाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल तुम्हाला दंडासह कारावासाची शिक्षाही होऊ शकते.
केंद्र सरकारने बनावट सिमकार्डच्या आधारे होणारे गुन्हे, फसवणूक रोखण्याच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले आहे. अशा स्थितीत दूरसंचार विभागाने नवे सिमकार्ड नियम जारी केले आहेत. 1 ऑक्टोबर 2023 पासून हे नियम लागू होणार होते. पण सरकारने 2 महिन्यांची अतिरिक्त वेळ दिली होती. आता नवे नियम 1 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहे.
नव्या नियमांतर्गत सिमकार्डची विक्री करणाऱ्यांना ग्राहकांची योग्यप्रकारे केवायसी करावी लागणार आहे. सरकारने सिमकार्ड खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना एकापेक्षा अधिक सिमकार्ड घेण्यावर बंदी घातली आहे. याचा अर्थ एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक सिमकार्ड खरेदी किंवा विक्री करु शकणार नाही.
फसवणुकीला बसणार चाप
याबाबत केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ”सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्याच्या उद्देशाने सरकारने सिमकार्डबाबत नवीन नियम जारी केले आहेत. नियमांतर्गत सर्व सिमकार्ड विक्रेता म्हणजे पॉईंट ऑफ सेलला (पीओएस) 30 नोव्हेंबरपर्यंत रजिस्टर करणे अनिवार्य आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास तब्बल 10 लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. याशिवाय जेलमध्येही जाण्याची वेळ येऊ शकते”.