(फोटो - टीम नवराष्ट्र)
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे सध्या दिल्ली दारू घोटाळ्याच्या आरोपात तुरुंगात आहेत. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी जामीन मिळण्याबाबत व सीबीआयने केलेल्या अटकेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आता उद्या सुप्रीम कोर्ट आपला निर्णय देणार आहे. केजरीवाल यांनी याचिकेतून जामीन मिळावा व सीबीआयची अटक याविरुद्ध याचिका केली आहे. त्यावर शुक्रवारी म्हणजे उद्या सुप्रीम कोर्ट आपला निर्णय देणार आहे.
दिल्ली दारू घोटाळ्याची चौकशी सीबीआय (केंद्रीय अन्वेषण ब्युरो) करत आहे. विशेष न्यायाधीशांनी केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. सीबीआयने काही आठवड्यांपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अरविंद केजीरवाल यांच्यावर खटला चालवण्यासाठी आवश्यक परवानगी घेतल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले होते.
दिल्ली दारू घोटाळ्यातून मिळालेला पैसा केजरीवाल यांच्या इच्छेनुसार खर्च केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, अरविंद केजरीवालांवर २०२२ मधील गोवा विधानसभा निवडणुकीत या पैशांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोर्टाने आरोपपत्राची दखल घेण्याची विनंती करताना सीबीआयने हा युक्तिवाद कोर्टासमोर केला होता.
हेही वाचा: अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार की सुटका? सिंघवी यांचा युक्तिवाद, FIR नंतर दोन वर्षांनी अटक
१२ ऑगस्ट रोजी केजरीवाल यांनी आपल्या अटकेला कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अशा परिस्थितीत आज केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाने अलीकडेच दारू घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया, के कविता आणि विजय नायर यांना जामीन मंजूर केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ९ ऑगस्ट रोजी मनीष सिसोदिया यांना के. कविता यांना २७ ऑगस्टला जामीन मंजूर केला. तसेच विजय नायरला २ सप्टेंबरला जामीन मंजूर करण्यात आला. ‘तुरुंग हा अपवाद आणि जामीन हा नियम आहे’, अशी टिप्पणी करत न्यायालयाने तिघांनाही जामीन मंजूर केला होता. अशा स्थितीत केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केजरीवाल सीबीआय प्रकरणात २६ जूनपासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहेत.