गुजरात समुद्रात संशयास्पद हालचाली; मच्छिमारांना परतण्याचे आदेश
Gujrat News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे पाकिस्तानसोबत तणाव शिगेला पोहचला आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानला लागून असलेल्या प्रत्येक सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचालींवर सुरक्षा संस्था सतर्क होत आहेत.अशातच गुजरातमधून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात संशयास्पद हालचाली आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. सर्व मच्छिमारांना त्यांच्या बोटींसह तात्काळ बंदरात परतण्यास सांगण्यात आले आहे.
जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि राजस्थान प्रमाणे, गुजरातची सीमा देखील पाकिस्तानशी आहे. गुजरातच्या किनारी भागात काही ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसून येत असल्याने सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, गुजरात समुद्रातील सर्व मच्छिमारांना त्यांच्या बोटी तात्काळ बंदरात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमरेली जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अलर्ट मिळाल्यानंतर प्रशासन पूर्ण खबरदारी घेत आहे. मासेमारी बोटींना ताबडतोब परतण्यास सांगण्यात आले आहे आणि बहुतेक मच्छीमार त्यांच्या बोटी घेऊन परतले आहेत. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. या संदर्भात राज्यातून मत्स्यव्यवसाय विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे टोकन प्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आली आहे.
Upcoming Smartphone: Vivo लाँच करणार तीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
जाफराबाद, चांच बंदर, धारा बंदर, शियाल बेट आणि नवा बंदर यासारख्या महत्त्वाच्या बंदरांवरून मासेमारी नौका परत बोलावण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत समुद्रात मासेमारीवर पूर्ण बंदी कायम राहील, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गुजरातमध्ये जारी केलेला हा इशारा सागरी सुरक्षेबाबत गंभीर चिंतेचा विषय आहे. सर्व सागरी सुरक्षा एजन्सी सध्या सतर्क आहेत आणि सागरी सीमेवर सतत लक्ष ठेवून आहेत. या उपाययोजनांद्वारे सरकार संशयास्पद हालचाली रोखण्याचा आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे. परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत, परिसरात सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.