प्रयागराज : माफिया अतिक (Atiq Ahmed Case) आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सनी सिंगबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. दिल्लीतील कुख्यात गुन्हेगार आणि गोगी टोळीचा सूत्रधार जितेंद्र गोगीने (Jitendra Gogi) आपला विरोधक टिल्लू ताजपुरियाच्या हत्येसाठी सनी सिंहला शस्त्रासह 10 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.
टिल्लू आणि त्याचे साथीदार फार हुशार होते. त्यामुळे जितेंद्रने सनी या नवीन व्यक्तीला हत्येची सुपारी दिली होती. सनीला तुर्की बनावटीच्या जिगाना आणि गिरसान या पिस्तुलांसह 10 लाख रुपयेही देण्यात आले होते. काम झाल्यानंतर तो गोगी टोळीत सामील होईल, असेही त्याला सांगण्यात आले होते. एसआयटीने कोर्टात दाखल केलेल्या केस डायरीमध्ये याचा खुलासा केला आहे.
अतिक आणि अशरफ हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीचे सदस्य दिल्लीला गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याठिकाणी जितेंद्र गोगी आणि त्याच्या टोळीशी संबंधित लोकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर सनी सिंग मेरठमधील एका व्यक्तीच्या माध्यमातून गोगी गँगच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे.