बंगळुरू : कर्नाटकातील (Karnataka Assembly Election 2023) 224 जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील जवळपास साडेपाच लाख मतदार 2615 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद करणार आहेत. राज्यात 58545 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यानंतर कर्नाटकाची सत्ता भाजपा (BJP) कायम राखते की जेडीएस (JDS) पुन्हा किंगमेकर ठरते हे 13 रोजी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होईल. या सोबतच 4 राज्यातही पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कर्नाटकच्या मतदारांना आवाहन करणारे एक खुले पत्र लिहिले आहे. तसेच एका व्हिडीओ संदेशाद्वारे भाजपाला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले आहे. आपल्याला लवकरात लवकर सर्वोच्च तीन अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये सामील व्हायचे आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा कर्नाटकची अर्थव्यवस्था जलदगतीने पुढे जाऊन एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पूर्ण करेल असे ते म्हणाले
कडेकोट बंदोबस्त
मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दीड लाखांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. राज्य पोलिसांच्या बरोबरच केंद्रीय राखीव पोलिस दलांची तसेच शेजारील राज्यातील पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी किमान 113 जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी 36. अनुसूचित जमातीसाठी 15 जागा राखीव आहेत.