तिरुअनंतपुरम : देशातून कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग कमी झाला असताना आता नव्या विषाणूचा धोका वाढला आहे. केरळमध्ये निपाह विषाणूमुळे (Nipah Virus) दोन जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा विषाणूही संसर्गजन्य असल्याने केरळमधील काही गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने उपाययोजनाही जाहीर केल्या.
केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात एका नऊ वर्षांच्या मुलासह चार लोकांमध्ये निपाहचे विषाणू सापडल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. बाधित भागातील काही शाळा व कार्यालये बंद करण्यात आली आहेत. आतापर्यंत 140 हून अधिक लोकांची निपाह विषाणूची चाचणी घेण्यात आली आहे.
सात ग्रामपंचायतींचा समावेश
विषाणूचा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे बाधित भागातील सात ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. कोझिकोडचे जिल्हाधिकारी ए गीता यांनी अटांचेरी, मारुयोंकारा, तिरुवल्लूर, कुट्टीयाडी, कयाकोडी, विलेपल्ली आणि कविलुमपारा या सात ग्रामपंचायतींचा कंटेनमेंटमध्ये समावेश केला आहे.