चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट; संपूर्ण कुटुंब झालं उद्ध्वस्त

    उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट झाला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे घरामध्ये देखील आग लागली. या घटनेमध्ये घरातील ४ चिमुकल्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर आई-वडील गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातील मोदीपुरम येथील जनता कॉलनीत शनिवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहिचतीनुसार, मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिखेडा येथे राहणारा जॉनी हा मजूर म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी जॉनी हा आपल्या कुटुंबासहित कामानिमित्त मेरठ शहरात आला होता. मोदीपुरम येथील जनता कॉलनीत तो भाड्याच्या घरात राहत होता. शनिवारी (ता २३) सायंकाळी जॉनी आणि त्याची पत्नी घरकामात व्यस्त होते. त्याचवेळी मुले समोरील खोलीत खेळत होती. दरम्यान, जॉनी याने आपला मोबाइल फोन मुलांना चार्जिंगला लावण्यास सांगितला. मोबाइल चॉर्जिंगला लावताच अचानक भीषण स्फोट झाला.

    या अपघातामधील सारिका (वय १०), निहारिका (वय ८), गोलू (वय ६) आणि कल्लू (वय ५) अशी मृत मुलांची नावे आहेत. तर जॉनी (वय ४१) आणि बबिता (३७) अशी गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.