उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आज; सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक आज होत आहे. विरोधी गटातील इंडिया आघाडी व सत्ताधारी एनडीएने सोमवारी जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी आजच होणार आहे. त्यानुसार, आज देशाला नवे उपराष्ट्रपती मिळणार आहेत.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संसदेतील एकूण ७८२ मतांपैकी जिंकण्यासाठी ३९१ मतांची आवश्यकता आहे. एनडीएकडे ३९१ पेक्षा सुमारे ३१ मते जास्त म्हणजे ४२२ मते आहेत. वायएसआरसीपीनेही एनडीए उमेदवाराला मतदान करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्याकडे १२ खासदार आहेत, त्यानंतर एनडीएकडे ४३४ मते असतील. तसेच, ‘इंडिया’ आघाडीला ३१२ मते मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये ९९ लोकसभा खासदार आणि काँग्रेसच्या २६ राज्यसभा खासदारांची मते समाविष्ट आहेत. परंतु, काँग्रेसला १९६९ प्रमाणेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराऐवजी सदस्यांनी विवेकाच्या आवाजावर इंदिरा गांधींचे उमेदवार व्ही. व्ही. गिरी यांना विजयी केले. यावेळीही असे होऊ शकते, असा अंदाज आहे.
हेदेखील वाचा : Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांना सपा, आपसह ‘या’ पक्षांनी दिला पाठिंबा; आता निवडणूक ठरणार निर्णायक?
दरम्यान, उपराष्ट्रपतिपदासाठी ‘इंडिया’चे सुदर्शन रेड्डी आणि एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन यांच्यात प्रमुख लढत होत आहे. त्यानुसार, आज मतदान होणार आहे. मतदानानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत निवडणूक निकाल येतील.
काँग्रेसची जोरदार तयारी
काँग्रेसने सुरुवातीला उपराष्ट्रपती निवडणुकीची तयारी गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून आले. नंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा सोनिया गांधी यांनी वैयक्तिकरित्या विविध पक्ष आणि खासदारांकडून पाठिंबा मागितला नाही. राहुल गांधीही याच दरम्यान, परदेशात गेले होते. पण दुसरीकडे, एनडीएचे समन्वयक म्हणून राजनाथ सिंह यांनी अनेक पक्षांशी बोलण्यास सुरुवात केली. परंतु या निवडणुकीचा आगामी काळात होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः आघाडी सांभाळली.
बीआरएस, बीजेडी दूर राहणार
या निवडणुकीतून दोन राजकीय पक्षांनी माघार घेतली आहे. यात बीआरएस आणि बिजू जनता दलाचा समावेश आहे. बीआरएसचे राज्यसभेत ४ सदस्य तर अकाली दल, झेडपीएम आणि व्हीओटीटीपीचे प्रत्येकी एक खासदार आहे. ३ अपक्ष खासदारांनी अद्याप पत्ते उघडलेले नाहीत. दरम्यान, अकाली दलानेही बहिष्कार टाकला आहे.