Vice President Election : सुदर्शन रेड्डी यांना सपा, आपसह 'या' पक्षांनी दिला पाठिंबा; आता निवडणूक ठरणार निर्णायक?
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी आता निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर इंडिया आघाडीने त्यांच्या विरोधात सुदर्शन रेड्डी यांना संधी दिली आहे. आता या पदासाठी येत्या 9 सप्टेंबरला मतदान होणार आहे. यामध्ये सुदर्शन रेड्डी यांना अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत आहे.
सी. पी. राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी हे दोन्ही नेते दक्षिणेतील आहेत. त्यामुळे आता पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. सध्या इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी हे अनेक विरोधी नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे आता त्यांना अनेक पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. सुदर्शन रेड्डी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), समाजवादी पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक), शिवसेना (यूबीटी), आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस देखील उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत न्यायमूर्ती रेड्डी यांना पाठिंबा देत आहेत.
दरम्यान, 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारताच्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत, ज्याची मतमोजणी त्याच दिवशी होईल, न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन यांच्या विरोधात विरोधी उमेदवार घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी रेड्डी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांना पाठिंबा मिळाल आहे.
एमआयएमचाही पाठिंबा
आता ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांना आमचा पक्ष पाठिंबा देईल, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतची पोस्टही त्यांनी ‘एक्स’वर केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांना निवडणुकीत जस्टिस रेड्डी यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यानंतर एआयएमआयएम हैदराबादी आणि आदरणीय कायदेतज्ज्ञ असलेल्या जस्टिस रेड्डी यांना पाठिंबा देणार आहे.