इम्फाळ : मणिपूरमधील वाढता हिंसाचार (Violence in Manipur) काही केल्या कमी होताना दिसत नाही. यापूर्वी तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह येथे सशस्त्र अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मणिपूर कमांडोंचा मृत्यू झाला तर तीन जवान जखमी झाले होते. असे असताना आता गेल्या 24 तासांमध्ये मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पिता-पुत्राचाही समावेश आहे.
बिष्णुपूर जिल्ह्यातील निंगथौखोंग खा खुनौ येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास अज्ञात बंदुकधाऱ्यांनी पिता-पुत्रासह चौघांची गोळ्या झाडून हत्या केली. ओईनम बामोंजाओ, ओइनम मनिटोम्बा, थियम सोमेन अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व निंगथौखॉन्ग खा कुनौ येथील रहिवासी होते. कांगपोकपी जिल्ह्यात दोन गटांत झालेल्या गोळीबारात चार नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये वडील व मुलाचा समावेश आहे. परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात एकत्रित झाल्या व त्यांनी या घटनेविरोधात इम्फाळ शहरात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान व राजभवनपर्यंत रॅली काढून निषेध नोंदविला. या मोर्चाला राजभवनपासून 300 मीटर आधीच रोखण्यात आले होते.
बंडखोरांच्या गटाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन बीएसएफ जवानांपैकी दोन सहायक उपनिरीक्षक (एएसआय) सोबराम सिंग आणि रामजी आहेत. तिसऱ्याचे नाव कॉन्स्टेबल गौरव कुमार असे आहे. त्यांना इम्फाळ येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सशस्त्र कार्यकर्त्यांनी जमावाच्या आडून थौबल जिल्ह्यातील खंगाबोक येथील तिसऱ्या मणिपूर सशस्त्र बटालियनच्या मुख्यालयाला लक्ष्य केले.