इम्फाळ : जातीय हिंसाचाराच्या (Communal Violence) आगीत होरपळत असलेल्या मणिपुरात इम्फाळ पश्चिमेतील इरिंगबाम पोलिस ठाण्यावर सुमारे 500 जणांच्या जमावाने हल्ला केला. याठिकाणी शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा दलांनी जमावाला (Manipur Violence) पळवून लावले. तर दुसऱ्या एका घटनेत भाजप आमदार विश्वजित यांच्या घराची जाळपोळ करण्याचा जमावाचा प्रयत्न करण्यात आला.
मणिपूर रॅपिड अॅक्शन फोर्स टीमने (Manipur Rapid Action Team) तो प्रयत्न हाणून पाडला. तिसरी घटना सिंजेमाईची आहे. इथे जमावाने भाजप कार्यालयाला घेराव घातला. मात्र, लष्कराच्या जवानांनी गर्दी पांगवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारोंच्या संख्येत असलेल्या जमावाने महाल परिसरातील इमारतींना आग लावण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करत रबरी गोळ्याही झाडल्या.
सुरक्षा दलावर हल्ला
विष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा आणि चुराचांदपूर जिल्ह्यातील कांगवई येथे शनिवारी सकाळी गोळीबाराच्या घटना घडल्या. जमावाने अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळही केली.
राज्यात लिबिया, सिरियासारखी स्थिती
सध्या मणिपूर राज्य हिंसक होत आहे. कोणीही कोणाचेही आयुष्य, मालमत्ता कधीही संपवू शकतो. जसे लिबिया, लेबनॉन, नायजेरिया, सीरियामध्ये घडत आहे तसेच. असे वाटते की मणिपूरला त्याच्या परिस्थितीवर सोडून दिले आहे.
– निशिकांत सिंह, निवृत्त लेफ्टनंट जनरल
मणिपूरमध्ये कुणाचे नियंत्रण आहे केंद्राचे की राज्याचे हा प्रश्न लोक विचारत आहेत. कोण प्रभारी आहे हे स्पष्ट व्हायला हवे अन्यथा स्थिती जैसे थे राहील. मणिपूरमध्ये कलम 355 लागू आहे. त्यामुळे येथील लोकांची सुरक्षा करणे राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु हिंसा रोखण्यासाठी कुठलीही योजना बनवली जात नाही. सध्या परिस्थिती सुधारेल अशी चिन्हे नाहीत. राज्यातील सुरक्षा व्यवस्था बिघडली आहे.
– वाय. जॉयकुमार सिंह, उपाध्यक्ष एनपीपी