नवी दिल्ली : मध्यप्रदेश (Madhya Pradesh) सर्व २३० जागांसाठी तसेच छत्तीसगडमधील (Chhattisgarh Election) दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि.१७) मतदान होत आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा असून, त्यापैकी २० जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजीच मतदान प्रक्रिया पार पडली होती. आता उर्वरित ७० जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल.
छत्तीसगडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील मतदानात ३४ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. छत्तीसगडमध्ये १ कोटी ६३ लाख १४ हजार ४७९ मतदार उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमध्ये बंद करणार आहेत. मध्यप्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी मतदान होत असून त्यापैकी २० जागांवर रोमांचक लढती होत आहेत. यापैकी अनेक जागांवर भाजपाचे नेते रिंगणात आहेत तर अन्य जागांवर नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सिहोरमधून रिंगणात असून, त्यांच्यासमोर अभिनेता विक्रम मस्तालने आव्हान उभे केले आहे. शिवराजसिंह पाचव्यांदा निवडणूक लढवित आहेत. छिंदवाडामधून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, मुरैनातील दिमनी मतदारसंघात केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, इंदूर १ मधून कैलास विजयवर्गीय तर राघौगढ मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचा मुलगा जयवर्धन सिंह नशीब आजमावत आहे.