विद्यार्थ्यांनी (Students) वेळेचं व्यवस्थापन करा, यश नक्की मिळेल असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांना दिला. पंतप्रधानांनी आज एकाच वेळी तब्बल 38 लाख विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला. पालकांनी सामाजिक अपेक्षांचा दबाव विद्यार्थ्यांवर टाकू नये असा सल्ला त्यांनी पालकवर्गाला दिलाय. पालकांच्या अपेक्षा चूक नाहीत. अगदी राजकारण्यांवरही अपेक्षांचं ओझ असतं असा टोला त्यांनी मारला.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सोशल मीडियावरुन सहभागी झाले होते. मनातून बोर्ड परीक्षेची भीती निघून जावी यासाठी मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
तुमच्यातील ताकदच तुम्हाला पुढे नेईल
जे विद्यार्थी मेहनत करतात त्यांच्या आयुष्यात बदल होतोच. एखादा विद्यार्थी कॉपी करून तुमच्या पेक्षा दोनचार मार्क अधिकचे मिळवेलही. परंतु, तो कधीच तुमच्या आयुष्यात अडसर ठरणार नाही. तुमच्यातील ताकदच तुम्हाला पुढे घेऊन जाईल, असंही ते म्हणाले.
कॉपी करू नका
कॉपी करण्यासाठी काही विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग करतात. मात्र, त्याने फायदा होत नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी परीक्षेला सामोरे जावं लागतं. कुठपर्यंत कॉपी कराल. कॉपी करून आज तुम्ही पुढे जाल. पण आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही, असंही ते म्हणाले.
शॉर्ट कट वापरू नका
तुम्ही मेहनत करा. परीक्षा येतात आणि जातात. आपल्याला आयुष्य जगायचं आहे. आपल्या शॉर्टकटमध्ये जायचं नाही. जर कोणी शॉर्ट कटचा मार्ग अवलंबत असेल तर तुम्ही तुमच्यावर फोकस करा, असा सल्ला त्यांनी दिला.
तो विषय आधी वाचा
काम केलं नाही तर थकवा जाणवतो. काम केल्याने आनंद वाटला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे. कठिण विषयावर लक्ष द्या, असं सांगतानाच पेन, पेन्सिल घेऊन एक डायरी लिहा. तुमचा वेळ कुठे वाया गेला ते पाहा.






